वाल्मिक गवांदे, इगतपुरीनामा न्यूज, दि. ७
तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील अनेक आदिवासी कुटुबांना अद्यापही गॅस सिलेंडरचे कनेक्शन मिळालेले नाही. तर गॅस कनेक्शन मिळालेल्या अनेक आदिवासी कुटुबांची आजही आर्थिक परिस्थिती गॅस सिलेंडर विकत घेण्याची नाही. त्यामुळे त्यांच्याकडे शासनाने दिलेल्या गॅस सिलेंडरच्या रिकाम्या टाक्या पडुन आहेत. संबंधितांना रॉकेल उपलब्ध झाले तर किमान कमी दरात चुल तरी पेटेल. यासाठी शासनाने आदिवासी भागातील कुटुंबांना रेशन कार्डवर रॉकेल मिळेल अशी व्यवस्था करावी या मागणीचे निवेदन बिरसा ब्रिगेड ( सह्याद्री ) संघटनेने तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना दिले.
इगतपुरी तालुका अतिवृष्टीप्रवण क्षेत्रात येत असल्याने पावसाचे प्रमाण भरपुर असते. या भागात अनेकदा विजपुरवठा वारंवार खंडीत होतो. तर कधी कधी महिना महिना वीज पुरवठा बंद होतो म्हणुन दिवा बत्तीसाठी रॉकेल गरजेचे आहे. तसेच भौगोलीक परिस्थिती पहाता या भागात जंगली श्वापदे, विंचू, सरपटनारे प्राणी आदींसह बिबटे यांची भीती कायम मोठ्या प्रमाणात असते. म्हणुन अंधारात दिवा, टेंभा लावण्याकामी रॉकेलची आवश्यकता असते. यासाठी प्रत्येक आदिवासी कुटुंबांना रेशन कार्डवर रॉकेल उपलब्ध करून द्यावे. त्याचप्रमाणे आदिवासी कुटुंबांच्या विविध समस्या प्रलंबित असुन आगामी काळात होणाऱ्या अधिवेशनात आदिवासींचे प्रलंबित मुद्दे लक्षवेधी सुचना म्हणुन लोकप्रतिनिधींनी मांडावे. आदिवासी समाजाला न्याय मिळवुन देण्याकामी सहकार्य करावे असे निवेदनात म्हटले आहे. बिरसा ब्रिगेड ( सह्याद्री ) संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल गभाले, सरपंच काशिनाथ कोरडे, तालुकाध्यक्ष शरद बांबळे आदींसह सदस्यांनी निवेदनावर सह्या केल्या आहेत.