इगतपुरी तालुक्यातील काळूस्ते गावाचा राज्यभर प्रसिद्ध असलेला बोहडा उत्सव.. ह्या उत्सवाच्या तयारीपासून समाप्तीपर्यंतच्या सोहळ्याचे वर्णन वाचले तर जणू आपणही त्यात सहभागी असल्याची प्रचिती येईल. शेवटपर्यंत नक्की वाचायला हवे.
- भास्कर सोनवणे, संपादक इगतपुरीनामा
लेखन : उमेश बबनदास बैरागी, प्राथमिक शिक्षक
बोहडा हा शब्द तसा आमच्या गावचा पण तो भोवाडा आहे. बोहडा उर्फ भोवाडा हा आता नवीन वाटतो. पण तो ज्याने ज्याने अनुभवला त्याला पुन्हा पुन्हा या पारंपरिक सोहळ्याची ओढ लागते. इगतपुरी तालुक्यातील काळुस्ते या आमच्या मुळ गावी वर्षाआड हा बोहडा मोठ्या उत्साहात पार पडत असतो. बोहडा आम्ही तसा लहानपणापासून अनुभवला तरी अगदी दरवेळेस तो नवाच वाटतो. वर्षभर कष्ट करणारे शेतकरी व बारा बलुतेदार यांनी यानिमित्ताने एकत्र येऊन उत्सव साजरा करण्याच्या पद्धती तशा गावोगावी वेगवेगळ्या. कोकणात गणेशोत्सव, खान्देशात कानबाई किंवा पश्चिम महाराष्ट्रातील काठी नाचवणे असे अनेक भागात उत्सव साजरे केले जातात ते यात्रेच्या निमित्ताने.
पूर्वी माणसाला काही वस्तु किंवा पदार्थ मिळण्यासाठी यात्रेची वाट पाहावी लागायची. एकदा यात्रा आली की लहान बालगोपाळांसह बायका आणि जेष्ठ मंडळी आपली मर्यादित असणारी हौस पूर्ण करून घेत असत. अर्थात स्वत:साठी काही घेण्यापेक्षा दुसऱ्याला घेऊन देण्यातला तो नितळ आनंद कधीच कुणी हिरावला नाही. गोडीशेव, रेवड्या, जिलेबी, भत्ता, भजी यापलीकडे काही मोठा खाण्याचा पदार्थ असूच शकत नाही. याची जाणीव आणि त्याबरोबरच जीवनाचा रहाट गाडा यातच गोड मानून जगणाऱ्या पिढीची आम्ही कदाचित शेवटची तत्कालीन शेंबडी पोरं असू. अनेक ठिकाणी आता यात्रा स्वरुप बदलले असले तरी एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करणे हा हेतू मात्र आजही अबाधित आहे. त्यातलाच आमचा हा बोहडा.
बोहड्याची वाट पाहणारे चाकरमाने आणि माहेरवाशीण यांना गावात आणुन जुन्या आठवणींना पुन्हा नव्याने बांधणारा हा बोहडा म्हणजे दोन वर्षे आमच्या काळुस्ते गाव व आजुबाजूच्या वाड्यांची नवसंजीवनी. आजच्या भाषेत Immunity Power Development करणारा हा सोहळा. बोहड्याची परंपरा आजही कुणाला आठवत नाही. पण आमच्या लहानपणापासून आम्ही पहातोय, अनुभवतोय असं म्हणणाऱ्या अनेक पिढ्या काळाच्या पडद्याआड गेल्या. आणि त्याच जुन्या जाणत्या मंडळींनी चालवलेली ही परंपरा श्रद्धा रुपाने आजही चालू आहे. बोहड्यातील पात्र नाचवणारे मुखवट्यामागचे चेहरे कितीही बदलले पण मुखवटे आणि त्यांची यथाशक्ती केलेली सेवारुपी जपवणूक आजही नवीन पिढीला प्रेरणा देणारी आहे.
बोहडा म्हटला की पात्रांना सोंगं म्हणण्याची परंपरा आहे. बोहडा साजरा करायची एक पद्धत आहे. अक्षयतृतीयेला गावातील पंच मंडळी बोहड्याची थाप देतात. थाप देणे म्हणजे बोहडा आहे आणि त्याची पूर्व तयारी करायची आहे यासाठी गावाला दिलेली आगावू सूचना. सालाबादप्रमाणे एकूण ३४ देव आणि राक्षस एकच छताखाली नाचण्याची बाब कुणालाही विशेष वाटावी अशीच आहे. या सोंगांची एक मोठी यादी आहे. अक्षयतृतीयेला पडलेली थाप आणि नंतर गाव सभेत सोंगं मिळवण्यासाठी चाललेली चढाओढ हा देखील एक महत्त्वाचा भाग. आळीनुसार ( आळी म्हणजे गल्ली ) व कुटूंबानुसार पात्र म्हणजेच सोंगं वाटली जातात. त्या त्या भावकीची नवीन पोरं जुन्या मंडळींच्या मार्गदर्शनाखाली मग तयारी करतात. सोंग कोण नाचेल, त्यासाठी काय साज लागेल, ते साहित्य कुठून मिळवायचं ते अगदी टेंभा कोण पकडेल ? इथपर्यंत भावकीच्या मिटिंगमध्ये नियोजन ठरत असतं. मिळालेलं सोंग मागील वेळी कुणी नाचवलं त्यापेक्षा आपण कसं भारी वठवायचं यासाठी मोठी गोपनीय हालचाल सुरू असते. आपल्या सोंगाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद जास्त मिळेल आणि लोकांच्या आयुष्यभर कसं हे लक्षात राहील अशी तयारी चालु असते. आणि हो..सर्व पात्रे ही पुरुषच करतात महिला एकही पात्र करीत नाही.
आम्हाला आठवणारी काही सोंगं …..सुत्रधार नाचवावा तो पांडुरंग मामा इदे यांनीच. नृसिंह नाचवावा खंडु कुंभारानेच. हनुमान नाचवावा तो वाऊळाच्या आमदारानेच. आमदार हे व्यक्तीचं नाव होतं. कारण त्यांचे वडील अनेकदा अपक्ष आमदारकीला उभे राहायचे आणि पराभूत व्हायचे. मग माझ्या नावापुढे आयुष्यभर आमदार नाव लागलं पाहिजे म्हणून मुलाचं नावच आमदार ठेवणारे भिकुनाथ राऊळ हे व्यक्तिमत्व. पात्र किंवा सोंगांची यादी मारुती मंदिरासमोर लावून प्रत्येकाला वार आणि तारीख दिली जाते. रात्री जेवणानंतर एकूण ७ दिवस ही सोंगं नाचवली जातात. त्यासाठी वाजंत्रीचे एकूण चार ताफे बोलवले जातात. त्यांना योग्य ते मानधन ठरवून ८ दिवस जेवणाची व राहण्याची व्यवस्था गावकरी करतात. सुत्रधार, गणपती, सारजा ही सोंगं रोज नाचवली जातात.
पात्र किंवा सोंगे अशी असतात ….१ सुत्रधार, २ गणपती, ३ सारजा म्हणजे सरस्वती, ४ विदुषक, ५ वाली सुग्रीव, ६ राम लक्ष्मण, ७ शुर्पनखा, ८ कुंभकर्ण, ९ इंद्रजीत, १० रावण, ११ अंगद, १२ मारुती, १३ खंडेराव, १४ तांबडा भैरव, १५ काळभैरव, १६ महादेव, १७ एकादशी, १८ रक्तादेवी, १९ अही मही रावण, २० भीम बकासुर, २१ गौळण, २२ चारण, २३ भिल्लीन, २४ बाळंतीण, २५ मासा, २६ वराह वामन अवतार, २७ विराट, २८ चोखा वेताळ, २९ आग्या वेताळ, ३० परशुराम, ३१ वीरभद्र, ३२ नृसिंह, ३३ म्हसोबा, ३४ गावदेवी लक्ष्मी माता
दररोजचे पाच सहा सोंगांची साधारण एक किलोमीटर असणाऱ्या उभ्या गल्लीत नाचताना होणारी दमछाक तर कधी नाचणारा वाजवणाऱ्यांना करतो बेजार. नाचणारे आणि वाजवणारे यांची जुगलबंदी आणि प्रेक्षकांची आरोळ्या, शिट्यांची साथ ही रंगत वाढवत असते. रस्य्त्याच्या दुतर्फा सर्व अंगणात गोधडी, चटई या आसनांची रेलचेल आणि चहा, छोटंसं फिरतं हॉटेल, बिडी काडीचा फिरस्ता असतो. शेवटच्या दोन दिवसात मात्र खेळणी, सौंदर्य प्रसाधने, खाऊ, संसारोपयोगी वस्तुंची दुकानं थाटलेली असतात. दररोज पहाटेपर्यंत हा उत्सव चालतो. पण शेवटच्या दिवशी मात्र रात्रभर सोंगं आणि सकाळी सातला सुरू झालेली देवीची मिरवणूक दुपारी बारापर्यंत बोहड्याचा शेवट करत असते.
यात विदुषकासारखी काही सोंगं गंमतीदार असतात ती नक्कल करून लोकांची करमणूक करतात. तर मारुती सोबतची वानर मंडळी खाऊ पळवण्यात तरबेज असतात आणि त्यांना तो हक्क प्रदान केलेला असतो. बाळंतीण, खांबातून निघणारा नृसिंह यासारखी सोंगं डोळ्यांत पाणी आणतात. बरेच वेताळ निघाले की अंगात येणारे म्हणजे घुमणारे वारा घेऊन मधूनच कुठूनही उठतात आणि त्या सोंगासमोर घुमतात. इंद्रजीत, रावण, शूर्पणखा, भीम बकासुर, कुंभकर्ण मोठ्या आवेशात असतात. महादेव, राम लक्ष्मणाला पाहून भोळी भाबडी मंडळी देव घरात आल्यागत लांबूनच मनोभावे दर्शन घेतात. चारण, भिल्लीन, गौळण यांचा एक ताल वेगळाच असतो.
सोहळ्याचा शेवटचा दिवस असतो मंगळवार. मंगळवारी पहाटपर्यंत एकदा का नृसिंह नाचून गेला की चाहूल लागते ती देवीची. देवीची मिरवणूक सुरु होण्याअगोदर बऱ्याच सुहासिनी आंघोळ करुन घरासमोर गल्लीत सडा रांगोळी करतात. औक्षणाचं ताट घेत चिल्ली पिल्ली मंडळी नवीन कपड्यात तयार असतात. यावर्षी कोरोनाच्या सावटाखाली हा बोहडा फक्त खंडीत होऊ नये म्हणून किमान देवीची मिरवणूक काढावी असा निर्णय गावकऱ्यांनी घेतला. त्यानुसार झालेल्या बैठकीत देवी नाचवण्याचा मान आमचे काका विजय बैरागी यांना दिला. बोहड्याच्या इतिहासात पहिल्यांदाच आमच्या कुटुंबात हा मान आला. त्यामुळे आनंद होताच पण मनात कोरोनाची भिती होती. तरी दोन दिवसांची तयारी करून मंगळवारी पहाटे आमच्या कुटुंबातील सर्व नातेवाईक जागरण करुन गावकऱ्यांनी दिलेल्या मानाला सार्थ करण्यासाठी तयारीत होते.
देवी नाचवताना राजा आणि राणी तिला संपूर्ण गावात नेत असतात. त्यामुळे राजा आणि राणी ही गावाचं प्रातिनिधिक स्वरुप असतं. देवीच्या मुखवट्याची पुजा करुन डोक्यावर चढवावा लागतो. देवीचं पात्र धारण करणारा पहाटेच गावदेवी लक्ष्मी मातेच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतो. त्याप्रमाणे आम्ही चार वाजेलाच आंघोळ करून दर्शन घेतले. देवीला गावभर दर्शन घडविणाऱ्या स्त्री पात्राची भूमिका आमचे लहान बंधू डॉ. शाम बैरागी तर पुरुष पात्राची भूमिका मला करावयाची होती. मनावर दडपण तर होतेच. पण आनंदाचा अनुभव पण होता. यथासांग पुजा करून वाजंत्रींच्या वाद्यावर ताल पकडला आणि मिरवणूक सुरु झाली सकाळी सातला. वाजंत्री वाजवत होते पण सुरुवातीला माझा पावलांचा ठेका चुकत होता. लगेच आबाजी बाबा या जेष्ठ आजोबांनी पुढे येऊन तो दुरुस्त केला. हळूहळू सुहासिनी देवीला ओवाळत, दर्शन घेत होत्या. रस्त्यावर घोंगडी, सतरंजी, चटई अंथरुन पाटावर देवीचे पाय ठेवून ते धूवून हळदी कुंकू लावून मनोभावे सेवा करणारे भोळे भाबडे चेहरे देवीला आपल्या मनातील इच्छा सांगत होते.
लहान एखाद दोन महिन्यांच्या बाळाला कुणी देवीच्या पायावर ठेवत होते. तर थरथरत्या हातांनी एखादी आजी देवीची यथाशक्ती ओटी भरून ओतप्रोत भरून पावल्याचा आनंद दाखवत होती. दहा वीस मीटरच्या अंतरावर पावलं थांबवली जात होती आणि पुजा अर्चा चालुच होती. मिरवणुकीत अग्रभागी असणारा पांढरा शुभ्र अश्व लहान मुलांना मधे मधे नाचवून आनंदी करत होता. तर त्यामागे म्हसोबाचं पात्रं हळूहळू पुढं जात होतं. मला आणि शामला हे सारं पाहून धन्यता वाटत होती. पण देवीच्या मुखवट्यामुळे आमच्या विजु काकाला काहीच दिसत नव्हतं. ते फक्त आम्ही धरलेल्या हातांनी नाचत आणि थांबा म्हटलं की पुजेसाठी थांबत. आजुबाजुला आमची काळजी घेणारे होतेच. देवीच्या सोबत आमचीही हळदी कुंकू लावून तर कधी पाय धुवून आराधना करणारे लोक पाहिले. लहानांपासून तर थोरांपर्यंत सर्व लोक आपापल्या घरासमोर जणू गावमातेची वाटच पाहत होते. मिरवणूक जसजशी पुढे जात होती तसं ऊन तापत होतं. पण याबाबत काहीच वाटत नव्हतं.
गावचे पोलीस पाटील, सरपंच व सदस्य सर्व या मिरवणुकीत सहभागी होते. तीर्थाटनाच्या निमित्ताने अनेक नद्यांना भेटी दिल्या असतील पण आजचा पावलावर पडणारा पाण्याचा प्रत्येक थेंब हा तीर्थासारखा भासत होता. ज्यांच्या अंगा खांद्यावर खेळून लहानचे मोठे झालो ते आज आमच्यातल्या देवत्वरुपाचं दर्शन घेत होते. कुणाच्या व्यथा तर कुणाचा आनंद जणू देवी ऐकत होती. देवीसमोर रडणारे डोळे, थरथरणारे हात, घुमणारे आवाज, लोळण घालणारे भक्त, कोरोना जाऊ दे म्हणून देवीला हात जोडून विनवणारे व साकडे घालणारे हात पाहताना श्रद्धा काय असते आणि त्यामुळे निर्माण होणारी मानसिकता माणसाला कशी बळ देते याची पदोपदी जाणीव होत होती. परंपरेच्या या सोहळ्यात फक्त आणि फक्त निर्मळ आनंद व पवित्र भावनेचा उत्साह होता. वाढवलेलं श्रीफळ आणि चुरमुऱ्याचाचा प्रसाद वाटला जात होता.
आमच्या मागे देवीला हवा घालणाऱ्या आमच्या कुटुंबातील सुहासिनी सतत देवीच्या मुखवट्याची व देवीची काळजी घेत होत्या. आमच्या पायाखाली खडे येऊ नये म्हणून त्या उचलणारे हात आम्ही पाहत होतो. देवीचा जयघोष आणि वाजंत्रींचा सूर चालु असताना संपूर्ण गाव पायाखाली कधी आलं हे कळलंच नाही सकाळी सातला सुरू झालेली मिरवणूक बरोबर साडे दहाला पुन्हा ग्रामदैवत मारुती मंदिरासमोर येऊन थांबली. अश्वाने देवीला पुढील दोन्ही पाय टेकवून नमस्कार केला म्हणजेच सलामी दिली आणि मिरवणूक संपली. मारुती मंदिरात आमचे मुखवटे उतरविण्यात आले. तेव्हा आमच्या काकांना चक्कर आली पण ते लगेच सावरले. आरती झाली आणि संपूर्ण गावचा हा सोहळा कोणतेही विघ्न न येता पार पडला.
खरं तर या सर्व सोहळ्यावर अप्रत्यक्ष नियंत्रण ठेवणारे पोलीस पाटील गंगाराम घारे बाबा, यशवंत नाना घारे, रामजी राणु घारे, आनंदा सारुक्ते, आबाजी घारे, मल्हारी बाबा, परीट बाबा दामु रायकर, किसनराव घारे, कोतवाल बाबा, बाबुराव घारे गुरुजी, छबा नाना घारे ही जेष्ठ मंडळी होती. दिनकर इदे, सोमनाथ घारे, भगवान खेताडे, सरपंच वनिता गवारी, अनिरुद्ध घारे, नामदेव घारे, रोहीदास घारे, राजेंद्र बैरागी, अशोक कोरडे, उत्तम पारधी, मंगेश शिंदे, रविंद्र बैरागी, लक्ष्मण घारे, राजाराम घारे, हिरामण घारे, गावात सेवा करणारे कर्मचारी आणि संपूर्ण ग्रामस्थांनी हा सोहळा अखंड चालू रहावा म्हणून केलेला प्रयत्न यशस्वी झाला.
तरीही गावचं भूषण माजी सभापती कै. रामदास विठ्ठलराव घारे यांची कमी वयात अचानक झालेली एक्झिट सर्वांना आठवण करून देत होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांच्या चौकटीत राहून कोणत्याही पाहुण्यांना आमंत्रित न करण्याची खंत मनात असली असली तरी पुढील बोहडा उर्फ भोवाडा या सोहळ्यासाठी सर्वांना उपस्थित रहाता यावे यासाठी मनापासून मातेच्या चरणी प्रार्थना.
भोवाड्याच्या निमित्ताने आठवलेला कै. अमृता इदे यांच्या ओठांवरील हा अभंग.
पापाची वासना नको दावू डोळा …
त्याहूनी आंधळा बराच मी ……
निंदेचे श्रवण नको माझे कानी ….
बधीर करोनी ठेवा देवा………
अपवित्र वाणी नको माझ्या मुखा…..
त्याहूनी मुका बराच मी ………
तुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा ……
तु एक गोपाळा आवडसी