इगतपुरीनामा न्यूज, दि. १४ ( निलेश काळे, पिंपळगाव मोर )
कोरोनाच्या वाढत्या संक्रमणावर आरोग्य यंत्रणा लढा देत आहेत. यासह लसीकरणाला देशात चांगला प्रतिसाद मिळत आहे. इगतपुरी तालुका प्रामुख्याने आदिवासीबहुल तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यात ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत लसीकरण सत्र दैनंदिन सुरू आहेत. इगतपुरी तालुक्यातील खेड भैरव जिल्हा परिषद गटात बऱ्याच आदिवासी नागरिकांमध्ये लसीबाबत गैरसमज आहेत. बारशिंगवे, राहुलनगर, वासाळी, इंदोरे आदी गावांतील नागरिक अजूनही लस घेण्यास तयार नाहीत. लस घेतल्यानंतर कोरोना होतो, लसीनंतर मृत्यू होतो ह्या प्रकारच्या गैरसमजांमुळे नागरिक लस घेण्यास धजत नाहीत. लसीबाबत राज्य सरकार व आरोग्य विभाग देखील जनजागृती करत असले तरीही नागरिकांमध्ये अनेक गैरसमज असल्याने परिसरात लसीकरण शिबिराकडे नागरिक पाठ फिरवत आहेत.
ह्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद खेड भैरव गटाचे सदस्य हरिदास लोहकरे यांनी गटातील वाड्या-पाड्या पिंजून काढल्या आहेत. घरोघरी जाऊन प्रत्येक व्यक्तीला कोरोना प्रतिबंधक लसीबाबत जनजागृती व प्रबोधन करत आहेत. लस घेतल्यानंतर कोणतेही दुष्परिणाम होत नाही. कोणताही दीर्घ त्रास होत नसल्याचे लोहकरे नागरिकांना समजावून सांगत आहेत. नागरिकांकडून त्यांना उत्तम प्रतिसाद मिळत असून अनेक नागरिक आता लसीकरण करून घेताहेत. यामुळे लसीकरण मोहिमेला हरिदास लोहकरे यांचा मोठा हातभार लागत आहे. सकाळपासून सायंकाळपर्यंत होणाऱ्या जनजागरण कार्यक्रमामुळे आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी कमी झाल्याचे चित्र आहे.
आदिवासी भागात कोरोना प्रतिबंधक लसीबाबत बऱ्याच अफवा व गैरसमज आहेत. लस सुरक्षित असून लस घेतल्याने कोरोना पासून संरक्षण होते. कोरोनाची बाधा झाली तरी त्रास कमी होतो. जीव मात्र वाचतो. शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी लस घेणे गरजेचे आहे. यासाठी गृहभेटी देऊन करीत असलेल्या जागृतीला यश मिळत असल्याने आनंद वाटतो.
- हरिदास लोहकरे, जिल्हा परिषद सदस्य, खेड