
इगतपुरीनामा न्यूज – महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागात असणारे पुर्वाश्रमी इगतपुरी व आता सटाणा येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता श्रेणी १ कौस्तुभ सुधीर पवार यांना त्यांच्या २०२४-२५ मधील उल्लेखनीय कामगिरीसाठी महाराष्ट्र शासनाकडून वैयक्तिक सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र प्रदान करुन गौरव करण्याचा निर्णय घेतला आहे. इंजि. कौस्तुभ पवार हे धडाडीचे अधिकारी असून नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात कार्यरत असतांनाही त्यांनी सर्वोत्तम कामगिरी केलेली आहे. सध्या ते सटाणा येथे आपली सेवा बजावत असून त्यांनी केलेल्या चांगल्या कामांची दखल शासनाकडून घेण्यात आली. याबद्धल नाशिक जिल्हाभरात त्यांचे अभिनंदन सुरु आहे. इगतपुरी तालुक्यात धान्य गोदाम, आयटीआय शेड बांधकाम, अस्वली स्टेशनजवळ.ब्रिटीश कालीन पुल रुंदीकरण, म्हैसवळण घाटाजवळील पुल, घोटी सिन्नर रस्ता काँक्रिटीकरण, आशियाई विकास बॅंक मार्फत घोटी भंडारदरा रस्ता रामा २३ रस्ता सुधारणा ही उल्लेखनीय कामे केली आहेत. तर सटाणा तालुक्यात अहवा ताहाराबाद नामपुर रस्ता रामा २० (भाग – सोमपुर ते नामपुर) सुधारणा, सोमपुर गावाजवळील मोसम नदीवरील लांब पुल, हरणबारी घाटात व्हाईट टॉपिंग या नव्या तंत्रज्ञानाने रस्ता सुधारणा, खमताणे ता. सटाणा धान्य गोदाम काम, राज्य उत्पादन शुल्क कार्यालय इमारतीचे बांधकाम ह्या माध्यमातून त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्ते, पूल, विविध विभागांच्या इमारती व इतर सार्वजनिक बांधकामे करण्यात येतात. इमारती, पुलांची संकल्पना तयार करुन व इतर माध्यमांचा म्हणजे संगणकाचाही उपयोग करुन संकल्पनाचित्रे बनवली जातात. सार्वजनिक इमारतींची विद्युतीकरणाची कामे करताना व प्रकल्प राबवताना जे तांत्रिक कौशल्य पणाला लागते आणि ज्यामुळे अशा अभियंत्यांची सेवा समाजाला भविष्यात फायद्याची ठरते. अशा अभियंत्यांचे प्रशासकीय व तांत्रिक कौशल्य लक्षात घेऊन त्यांचा वैयक्तिक पुरस्कार देऊन शासनातर्फे गौरव करण्यात येतो. भारतरत्न सर विश्वेश्वरय्या यांचा १५ सप्टेंबर हा जन्मदिवस दरवर्षी “अभियंता दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अभियंत्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येते. राज्यातील ३२ अभियंत्यांचा शासनाने गौरव करण्याचा शासन निर्णय काढला आहे. यामध्ये इंजि. कौस्तुभ सुधीर पवार यांचा समावेश आहे.