
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील जिल्हा शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी शिजवल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहाराच्या लेखा परीक्षणासाठी प्रत्येक शाळेच्या शिक्षकांकडून ३०० ते ४०० मागितले जात असल्याचा गंभीर आरोप मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ सपकाळे यांनी केला आहे. एका वर्षात एकदा लेखा परीक्षण करावे असे असतांनाही वर्षात चार वेळा लेखा परीक्षण करून प्रत्येक शाळेतल्या शिक्षकांना वेठीस धरण्यात येत आहे. परिणामी इगतपुरी तालुक्यात शालेय पोषण आहार योजनेत गैरव्यवहार करायला अधिकारी प्रोत्साहन देत असल्याचाही गंभीर आरोप त्यांनी केला आहे. अधिकाऱ्यांच्या पथकाला भोजन देण्यासाठी सुद्धा प्रत्येक शाळेकडून १०० रुपये वसुल केले जात आहेत. यामध्ये इगतपुरी पंचायत समिती शिक्षण विभागातील अधिकारी, केंद्रप्रमुख सहभागी असल्याचेही श्री. सपकाळे यांनी सांगितले. इगतपुरी तालुक्यात शालेय पोषण आहार पुरवठा होत असलेल्या जवळपास ३०० शाळा असून लेखा परीक्षण करण्यासाठी या शाळांकडून मोठी रक्कम वसुल केली गेली आहे. संबंधित अधिकाऱ्यांचे बँक खाते, युपीआय, फोनवरील संपर्क तपासल्यास गैरव्यवहार उघडकीस येऊ शकतो. दरम्यान इगतपुरीचे गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनी आमचे सूक्ष्म लक्ष असून असा कोणताही प्रकार होणार नाही यासाठी दक्षता घेतली जात असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. इगतपुरी तालुक्याच्या ग्रामीण भागात पोषण आहार योजनेवर शिक्षण विभागाचे नियंत्रण नसून काम करणाऱ्या अनेक महिला योजनेचे धान्य, डाळी, तेल वगैरे काळ्या बाजारात विक्री करीत आहेत. नियमानुसार पोषण आहार शिजवला जात नसून पंचायत समितीचे अधिकारी लक्ष देत नाहीत अशी प्रतिक्रिया ग्रामीण भागातून व्यक्त होत आहे.
केंद्र व राज्य शासनाकडुन राज्यभरातील शाळांमध्ये माध्यान्ह भोजन योजना सुरु आहे. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातून विविध अन्न पुरवठा केला जातो. या पुरवठा आणि अन्न शिजविण्याबाबत गावागावातील महिला बचत गट वा अन्य यंत्रणेमार्फत शाळेत पोषण आहार शिजविला जातो. या संदर्भात दरवर्षी वर्षाच्या शेवटी लेखा परीक्षण होणे गरजेचे असते. मात्र इगतपुरी शिक्षण विभाग नेहमीच आपल्या वेगळ्या अशा कार्यामुळे चर्चेत राहत असतो. या वर्षभरात जवळ जवळ तीन चार वेळा लेखा परीक्षणाच्या नावाखाली आता आणि या आधीही ३०० ते ४०० रूपयांची मागणी प्रत्येक शाळेतील शिक्षकांकडुन केली गेली. आजही ऑडीटच्या नावाखाली येणाऱ्या अधिकारी पथकाला जेवण देण्यासाठी प्रति शाळा १०० रुपयांची मागणी करण्यात आली. या सर्व लूटमार होत असलेल्या परिस्थितीमुळे मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ सपकाळे यांनी ही गंभीर बाब उघडकीस आणून विरोध दर्शविला आहे. शिक्षक संघटनेच्या जिल्हाध्यक्ष असलेल्या व्यक्तीने आरोप करणे अतिशय गंभीर असून यामुळे इगतपुरी शिक्षण विभाग रडारवर आला आहे. शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणी लक्ष घालून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.