– माधुरी केवळराव पाटील
जि. प. शाळा, मोडाळे
ता. इगतपुरी जि. नाशिक
संपर्क : 7588493260
शाळेची घंटा अनेक महिन्यांपासून वाजत नसल्याने शाळेची लागलेली ओढ ह्या कवितेतून प्रतीत होते. विद्यार्थ्यांच्या मनातल्या ओढीची ही कविता खास आपल्यासाठी…!
राहील का आई मला
शाळेची माझ्या गोडी
सगळंच झालं विसराया
तू मदत करशील थोडी.. !!१!!
नाही चित्र नाही ती होडी
खेळ नाही तो पळापळी
वर्ष झालं आहे बसून
नाही वाजली ती टाळी.. !!२!!
आठवण येते रोज मला
गोलात बसून जेवणाची
एकमेकात वाटून खातो
भात उसळ ती वरणाची.. !!३!!
मोठी सुट्टी लहान सुट्टी
कानी माझ्या पडली नाही
शाळेची ती साफसफाई
हातून माझ्या घडली नाही.. !!४!!
चार वाजता व्हायचा रोज
आवडीचा तो माझा तास
मज्जा मस्ती धमाल कुस्ती
आता झोपेत होतो भास.. !!५!!
कधी भेटतील गं सखे
गप्पा गोष्टी त्या करायला
कधी कट्टी तर कधी बट्टी
खोडी काढून भांडायला.. !!६!!
पाढे पाठ नसले तर
मिळत होती ती शिक्षा
शाळेत जाण्यासाठी रोज
वाट पाहते माझी रिक्षा.. !!६!!
6 Comments