
इगतपुरीनामा न्यूज – मंगळवारी रविकांत मधुकर फसाळे याने त्याच्या मोबाईलवरून निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन येथे फोन करून शालेय विद्यार्थ्यांच्या सहलीच्या बसला अपघात झाला असल्याची खोटी माहिती दिली. ह्या अपघातात ४ व्यक्ती मयत व १५ व्यक्ती जखमी असुन अपघात मुंबई नाका येथे झाल्याचे असे त्याने सांगितले. त्याबाबत आपत्ती व्यवस्थापन, नाशिक शहर पोलीसांकडून खात्री करता कोणताही अपघात झालेला नसल्याचे समजले. पुन्हा मोबाईल फोनवर त्याला संपर्क साधला असता त्यांनी आम्ही घोटी जवळ दवाखान्यात आहोत असे सांगितले. याबाबत नाशिक आपत्ती व्यवस्थापन यांनी इगतपुरीचे तहसिलदार अभिजित बारवकर यांना संपर्क साधुन घोटी येथे कोणत्या दवाखान्यात मयत अथवा जखमी गेलेले आहेत, त्यांना योग्य ती मदत करा याबाबत सूचना देण्यात आल्या. तहसिलदार, यांनी पोलीस निरीक्षक वाडीवऱ्हे, घोटी, इगतपुरी यांना अपघाताची अशी घटना घडली असल्याबाबत खात्री करण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी धामणगाव एसएमबीटी हॉस्पीटल येथे खात्री केली. अशा कोणत्याही अपघातातील जखमी अथवा मयत येथे आलेले नाही बाबत खात्री झाली. आपत्ती व्यवस्थापन शाखा यांनी पुन्हा रविकांत मधुकर फसाळे याला त्याच्या मोबाईलवर संपर्क साधुन खात्री केली असता त्यांनी आम्ही मुंबईकडे खाजगी वाहनाने जात आहोत असल्याचे सांगितले. तहसिलदार यांना आमचे खाजगी वाहनाचे डिझेल संपलेले आहे आम्हाला त्यासाठी पैसे ऑनलाईन पाठवुन मदत करा असे फसाळे याने सांगितले. तहसिलदार यांनी तुमचे लोकेशन कोठे आहे मी तेथे येवुन रोख पैसे देतो. वाहनचालकाशी माझे बोलणे करून द्या असे सांगितले असता त्याने मोबाईल कट केला. नंतर त्याला वारंवार फोन केला असता त्याने फोन उचलला नाही. यावरून अपघाताचा कोणताही प्रकार घडलेला नसल्याचे निष्पन्न झाल्याने निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांनी तहसिलदार यांना त्याचा शोध घेवुन त्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे पत्र दिले. इगतपुरीच्या मंडळ अधिकारी पुनम लिलके यांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात मोबाईल धारक रविकांत मधुकर फसाळे, वय ३३, रा. मोरांडा, ता. मोखाडा, जि. पालघर याच्या विरोधात फिर्याद देऊन गुन्हा दाखल केला. त्याला अटक करण्यात आली आहे. यापुर्वी त्याने याच प्रकारे मोबाईलवरून येवला शहर, विक्रमगड, लकडगंज पोलीस ठाणे हद्धीत लोकांना मदतीसाठी फोन केले आहेत. त्या ठिकाणी पैसे घेवून फसवणुक केल्यासह तेथे त्याच्यावर गुन्हे दाखल आहे. पोलीस अधिक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी हरिष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरीचे पोलीस निरीक्षक राहुल तसरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, पोलीस उपनिरीक्षक. एस. के. शिंदे, सहा पोलीस उपनिरीक्षक जी. डी. परदेशी, हवालदार डी. जी. निकुंभ, सचिन देसले, किशोर बोडखे, रोहीत पगारे, तंत्र विश्लेषण हेमंत गिलबिले, प्रदिप बहीरम यांनी ही कारवाई केली आहे.