
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील टाकेदच्या विद्यार्थिनीवरील मुख्याध्यापक आणि शिक्षकाच्या उघडकीस आलेल्या प्रकरणामुळे इगतपुरी तालुका राज्यात बदनाम झाला आहे. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पर्यवेक्षिय कामकाजात अक्षम्य हलगर्जीचा हा दुष्परिणाम आहे. इगतपुरी तालुक्याचे निसगसौंदर्य असणाऱ्या आणि महामार्गावरील हॉटेल फार्महाऊसवर अधिकारी आणि शिक्षक यांच्या ओल्या सुक्या पार्ट्या होत असल्याच्या गंभीर तक्रारी आहेत. यासह संबंधित काही अधिकारी आणि शिक्षक यांनी त्यांच्या मूळ गावी कायदेभंग करणारे कामे केले असल्याची वदंता आहे. ह्या पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील अधिकारी अन शिक्षकांवर प्रचंड संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. म्हणून इगतपुरी तालुक्यातील पंचायत शिक्षण विभागातील सर्व अधिकारी, विस्ताराधिकारी, केंद्रप्रमुख, पोषण आहार अधीक्षक, प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, सर्व मुख्याध्यापक या सर्वांची त्यांचे मूळ गाव आणि वास्तव्याच्या सध्याच्या ठिकाणी पोलीस चारित्र्य पडताळणी करणे अत्यंत आवश्यक आहे. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे इगतपुरी तालुकाध्यक्ष माजी सभापती पांडुरंग वारुंगसे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, ना. एकनाथ शिंदे आणि शिक्षणमंत्री ना. दादा भुसे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. पोलिसांकडून चारित्र्य पडताळणी ऑनलाईन स्वरूपात होत असते. शिक्षकही तंत्रस्नेही असल्याने घरबसल्या पडताळणी करून मिळेल. यामुळे शैक्षणिक कामावर कोणताही परिणाम होणार नाही. चारित्र्यपडताळणी दाखले न दिल्यास संबंधितांना मार्च महिन्याचे वेतन अदा करू नये असेही पत्रात म्हटले आहे.
शिक्षण विभागाचे अधिकारी आणि सर्व शिक्षक यापैकी अनेकजण व्यसनी असून काही महाभाग नोकरीवर फुल्ल असल्याचे ऐकीवात आहे. काहींनी पाथर्डी फाटा, जत्रा हॉटेल औरंगाबाद रस्त्यावरील भागात धिंगाणे घातले असल्याचे चर्चेतून कळते. यासह मूळ गावी जमिनी, भाऊबंदकी, सावकारी आदी कारणांनी काही जणांना पोलीस ठाण्याची पायरी चढायला लागली आहे. ही सर्व गुन्हेगारी स्वरूपाची लक्षणे आढळून आली आहेत. पंचायत समितीमध्ये सभापती म्हणून काम करतांना याबाबत मोठे अनुभव आले आहेत. यामुळे शाळांमध्ये शिक्षकांवर पालकांचा प्रचंड अविश्वास निर्माण झाला आहे. याचे तातडीने निराकारण करण्यासाठी दखल घेऊन इगतपुरी तालुक्यातील पंचायत शिक्षण विभागातील सर्व अधिकारी, विस्ताराधिकारी, केंद्रप्रमुख, पोषण आहार अधीक्षक, प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, सर्व मुख्याध्यापक या सर्वांची त्यांचे मूळ गाव आणि वास्तव्याच्या सध्याच्या ठिकाणी पोलीस चारित्र्य पडताळणी करावी. न केल्यास मार्चचे वेतन रोखावे. चारित्र्यपडताळणी करतांना गुन्हेगारी स्वरूपाचे प्रकरण आढळून आल्यास संबंधितांना बडतर्फ करावे असेही पांडुरंग वारुंगसे यांनी पत्रात म्हटले आहे.