इगतपुरीनामा न्यूज – जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा सदेह वैकुंठगमनाचा त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवासह इगतपुरी येथे स्वानंदसुखनिवासी सद्गुरु श्री जोग महाराजांनी जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या सद्गुरु अनुग्रहाच्या निमित्ताने माघ शुद्ध दशमीला सुरु केलेल्या नाम सप्ताहाचा यावर्षी शतकोत्तर रौप्य महोत्सव अर्थात १२५ वे वर्ष आहे. या दोन्ही महोत्सवाच्या निमित्ताने भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात हा सप्ताह उद्या २ ते ९ फेब्रुवारी पर्यंत संपन्न होणार आहे. उद्या २ फेब्रुवारीला विविध साधू संत, लोकप्रतिनिधी आणि भाविकांच्या उपस्थितीत सकाळी ७ वाजेपासून विविध कार्यक्रम आणि प्रारंभ करण्यात येणार आहे. या अभूतपूर्व कार्यक्रमाचा भाविकभक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन वारकरी शिक्षण संस्था, जोग महाराज भजनी मठ आणि इगतपुरी तालुक्यातील भाविकांनी केले आहे.
सप्ताह काळात दररोज पहाटे ४ ते ६ काकडा भजन, सकाळी ७.४५ प्रार्थना, सकाळी ८ ते ९ ह्या वेळेत गणेश महाराज ठाकूर, डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर, दामोदर महाराज गावले, जयंत महाराज गोसावी, तुकाराम महाराज परसूलकर, बन्सी महाराज उबाळे, देवराम महाराज गायकवाड यांचे प्रवचन, सकाळी ९.३० ते ११.३० ह्या वेळेत वैभव महाराज राक्षे, लक्ष्मण महाराज मेंगडे, ज्ञानेश्वर महाराज शिंदे, उल्हास महाराज सूर्यवंशी, उमेश महाराज दशरथे, ज्ञानेश्वर महाराज कदम, जगदीश महाराज जोशी यांचे कीर्तन होईल. दुपारी २.३० ते ४.३० चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांचे तुकोबाराय चरित्र, सायं ५ ते ६ हरिपाठ, सायं ६ ते ८ कीर्तन ह्या वेळेत बंडा महाराज कराडकर, तुकाराम महाराज जेऊरकर, पुंडलिक महाराज जंगलेशास्त्री, चंद्रशेखर महाराज देगलूरकर, चैतन्य महाराज देगलूरकर, पांडुरंग महाराज घुले, संदीपान महाराज शिंदे यांची कीर्तने होतील. रात्री ९ ते ११ ह्या वेळेत हर्षद गोळे, सागर कुलकर्णी, जगदीश चव्हाण, कृष्णा ठाकूर, महेश कंठे, शंकर वैरागकर, बाळासाहेब वाईकर, आदिनाथ सटले, शंकर गिरी, कृष्णा बोंगाने, पांडुरंग पवार यांची संगीत भजने होईल. शनिवारी ८ फेब्रुवारीला दुपारी २ ते ३ पर्यंत मारुती महाराज कुरेकर यांचे विशेष प्रवचन होईल. रविवारी ९ फेब्रुवारीला सकाळी ७ ते ९ दिंडी सोहळा होईल. सकाळी ९ ते ११ ला जोग महाराज भजनी मठ अध्यक्ष हभप गुरुवर्य माधव महाराज घुले यांचे काल्याचे कीर्तन होईल. यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.