इगतपुरीनामा न्यूज – आपल्या गावाच्या विकासासाठी अनेकांना ग्रामपंचायतीची निवडणुक लढायची असते. यावर आपला वरचष्मा राखण्यासाठी अनेकानेक प्रकारे क्लुप्त्या वापराव्या लागतात. मतदार अर्थात गावकरी आणि युवकांची मर्जी संपादन करावी लागते. थेट सरपंचपद आणि ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून यावे यासाठी सर्वांगीण प्रयत्न केले जातात. उपसरपंच पदासाठी निवडणुकीनंतर प्रयत्न केला जातो. मात्र ही निवडणुक लढवण्यासाठी निवडणुकीची घोषणा झाल्यावर काय काय कागदपत्रांची पूर्तता करायची याबाबत सर्वांनाच अज्ञान असते. राज्य निवडणुक आयोगाकडून राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुका घोषित केल्या जातात. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्याचे तहसीलदार याबाबतचे कामकाज पाहतात. प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी स्वतंत्र निवडणुक निर्णय अधिकारी नियुक्त केला जातो. ग्रामपंचायत निवडणूक लढवतांना उमेदवारी अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे जोडावी याबाबत आज आपण माहिती घेणार आहोत. ग्रामपंचायत निवडणुकीत थेट सरपंच, ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवारासाठी ही माहिती उपलब्ध करत आहोत. अद्याप निवडणुकीची घोषणा होणे बाकी असून तत्पूर्वी इच्छुकांना कागदपत्र जमा करण्यासाठी आज मार्गदर्शन करीत आहे. याव्यतिरिक्त अधिक माहिती आणि मार्गदर्शन हवे असल्यास आपण ९८८१२५८४४३ ह्या व्हाट्सअपवर संपर्क साधू शकता.
ग्रामपंचायतीच्या ज्या वार्डात उमेदवाराचे नाव आहे त्या मतदारयादीच्या पानाची प्रत, निवडणुकीसाठी राष्ट्रीयकृत बँकेत नवीन बँक खाते उघडलेल्या पासबुकची प्रत, १२ सप्टेंबर २००१ नंतर अपत्यांची संख्या २ पेक्षा जास्त नसल्याचे उमेदवाराचे स्वघोषणापत्र, राखीव प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी जातीचा दाखला, जात पडताळणी प्रमाणपत्र प्रत./ जात पडताळणी प्रमाणपत्र नसल्यास जात प्रमाणपत्र समितीकडे सादर केलेल्या प्रस्तावाची पोहोच पावती व निवडून आल्यानंतर १२ महिन्यांच्या आत सादर करण्याचे हमीपत्र, २१ वर्षे पूर्ण असल्याबाबत शाळा सोडल्याचा दाखला/आधार कार्ड, ग्रामपंचायतीचा थकबाकीदार नसल्याचे प्रमाणपत्र, घरपट्टी, पाणीपट्टी भरल्याची पावती, ग्रामपंचायतीचा ठेकेदार नसल्याचे प्रमाणपत्र किंवा स्वघोषणापत्र, शौचालय असल्याचे प्रमाणपत्र किंवा स्वघोषणापत्र, इच्छुक उमेदवार महिला असेल तर माहेरचे आणि सासरचे नाव आणि व्यक्ती एकच असल्याचे शपथपत्र अथवा राजपत्राची प्रत जोडावी. निवडणुक चिन्ह निवडीबाबत पत्र, वरील सर्व कागदपत्र आणि स्वयंघोषणापत्रावर स्वाक्षरी करावी. इच्छुक उमेदवाराला निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर ऑनलाईन उमेदवारी अर्ज करावा लागेल. त्यानंतर त्या अर्जाची प्रिंट काढावी लागते. उमेदवाराने ऑनलाईन भरलेल्या फॉर्मवर आवश्यक त्या सर्व ठिकाणी स्वाक्षऱ्या कराव्या. त्या प्रिंटसोबत वरील कागदपत्र जोडून ती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा करावी लागतात. राखीव प्रवर्ग असल्यास १०० रु., सर्वसाधारण उमेदवारासाठी ५०० रु. अनामत रक्कम भरल्याची मूळ पावती सोबत जोडणे आवश्यक आहे. मुदतीच्या आत निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांकडे वरील सर्व कागदपत्र दाखल करून तशी पावती घ्यावी. यानंतर छाननीवेळी आपल्याकडे सर्व मूळ कागदपत्र सोबत असावेत.