काशिनाथ मेंगाळ उमेदवारी करून १५ वर्षाचा राजकीय वचपा भरून काढणार ? : २ दिवसांपासून ‘वर्षा’वर ठोकला तळ, इंदिरा काँग्रेसही उमेदवारीसाठी आग्रही : कोणत्याही परिस्थितीत काशिनाथ मेंगाळांनी उमेदवारी करण्याचा समर्थकांचा आग्रह

इगतपुरीनामा न्यूज – शिवसेना शिंदे गटाची जागा असतांनाही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने विद्यमान आमदारांना तिकीट जाहीर केले आहे. मात्र महत्वाच्या संस्थांनी केलेल्या ताज्या निवडणूक सर्व्हेमध्ये माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांचेच नाव संभाव्य विजेत्यांच्या यादीत आल्याचे वृत्त आहे. कोणत्याही परिस्थितीत काशिनाथ मेंगाळ हे विजयी होणार असल्याचा अहवाल आहे. काशिनाथ मेंगाळ यांनी इंदिरा काँग्रेसतर्फे उमेदवारी करावी यासाठी दिल्लीत राज्यातील काँग्रेस नेत्यांनी सखोल चर्चा केली. त्यानुसार मेंगाळ यांना काँग्रेसची उमेदवारी दिल्यास विद्यमान आमदारांना नामोहराम करता येईल असा सर्वांचा कयास आहे. त्यामुळे दोन दिवसापासून काशिनाथ मेंगाळ हे ‘वर्षा’वर तळ ठोकून आहेत. खुद्द मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी श्री. मेंगाळ यांना पाचारण केलेले असून राज्यातील काही जागांवर शिवसेना शिंदे गट लढा देणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. दरम्यान काशिनाथ मेंगाळ यांना इगतपुरीची उमेदवारी करण्याबाबत ठरवण्यात येणार असल्याचे निश्चित झाले आहे. यानुसार इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा क्षेत्रातील आदिवासी ठाकूर समाजाने एकजूट दाखवण्याचा निर्धार केला आहे. समाजमाध्यमातून हा संदेश प्रत्येक ठाकूर समाजाच्या व्यक्तीपर्यंत पोहोचला आहे. गावपातळीवर दुपारपासून बैठका सुरु असून माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांच्या विजयासाठी प्रत्येकाने तन मन धनाने योगदान देण्याचे ठामपणे निश्चित केले आहे. दुसरीकडे घोटी, इगतपुरी, वाडीवऱ्हे, गोंदे, साकुरफाटा, त्र्यंबकेश्वर, अंजनेरी आदी भागातील मराठा समाजातील तरुणांनीही काशिनाथ मेंगाळ यांच्यासाठी परिश्रम घेणार असल्याचे ठरवले असल्याचे खात्रीदायक समजते. कोणत्याही परिस्थितीत काशिनाथ मेंगाळ यांनी उमेदवारी करावी असा समर्थकांनी निश्चय केला आहे. याबाबत मेंगाळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता.

माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनी त्यांच्या कार्यकाळात सर्वांसाठी खूप चांगले काम केले आहे. सर्व जातीधर्माच्या माणसांशी त्यांचा जिव्हाळ्याचा स्नेहसंबंध आहे. २०१९ ला निर्मला गावितांचा विजयी रथ रोखण्यासाठी हिरामण खोसकर यांना त्यांनी मदत केली. त्या बदल्यात २०२४ ला काशिनाथ मेंगाळ यांना सर्व मदत करण्याचे ठरवण्यात आले. मात्र कोणीही शब्द पाळला नाही. त्यातच राष्ट्रवादीत गेलेले आमदारांना तिकीट देण्यात आले. यामुळे काशिनाथ मेंगाळ यांचे असंख्य समर्थक नाराज झाले. त्यानुसार मेंगाळ यांनी कोणत्याही राजकीय पक्षाकडून उमेदवारी केल्यास ताकद दाखवू पण त्यांनी उमेदवारी करावी असे साकडे घालण्यात आले. यासह ताज्या निवडणूक सर्व्हेमध्ये काशिनाथ मेंगाळ यांचे पारडे सर्वांपेक्षा जड असेल असा अहवाल मुख्यमंत्री ना. शिंदे यांच्याकडे देण्यात आल्याचे कळते. त्यानुसार श्री. शिंदे यांनी काशिनाथ मेंगाळ यांना निवासस्थानी बोलावून घेतलेले आहे. २ दिवसापासून ते वर्षावर तळ ठोकून असून रणनीती आखली जाते आहे. कोणत्याही क्षणी शिवसेना शिंदे गट मेंगाळ यांच्या उमेदवारीबाबत योग्य निर्णय घेईल अशी दाट शक्यता आहे. इगतपुरीचे लोकप्रिय आमदार म्हणून काशिनाथ मेंगाळ यांच्याकडे राज्यभर पाहिले जाते. गेल्या पंधरा वर्षाचा राजकारणाचा वचपा भरून काढण्यासाठी ते मजबुतीने सज्ज झाले आहेत.

Similar Posts

error: Content is protected !!