भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – जो तो उठतो सुटतो अन इगतपुरी विधानसभा मतदारसंघ इंदिरा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणतो. काँग्रेसचा हा मतदारसंघ अजिबातच बालेकिल्ला नसून दोन टर्म आमदारकी भूषवलेल्या माजी आमदार निर्मला गावित यांचा हा करिष्मा आहे. अर्थातच इगतपुरी तालुक्याचे तारणहार लोकनेते स्व. गोपाळराव तथा दादासाहेब गुळवे यांच्या आशिर्वादाशिवाय हा करिष्मा होणे दुरापास्त आहे. इंदिरा काँग्रेस पक्षाचे तिकीट मिळाले म्हणजे आपणच आमदार होऊ हा अनेक इच्छुक उमेदवारांचा गैरसमज आहे. माजी आमदार निर्मला गावित यांच्या कार्याचा आलेख पाहता त्यांच्यामुळेच इंदिरा काँग्रेसला “अच्छे दिन” पाहायला मिळाले. लोकनेते स्व. गोपाळराव गुळवे आणि माजी केंद्रीय मंत्री स्व. माणिकराव गावित यांच्या दूरदृष्टीच्या राजकारणामुळे इंदिरा काँग्रेस इगतपुरी मतदारसंघात तग धरू शकली. स्व. गोपाळराव गुळवे यांच्या आशीर्वादाने त्यांना मानणारे बहुतांशी मतदार निर्मला गावित यांच्या आजही पाठीशी आहेत. त्यामुळेच इंदिरा काँग्रेसचे २००९ च्या निवडणुकीतच पानिपत झाले असते ते वाचले. इगतपुरी काँग्रेसचा बालेकिल्ला अजिबातच नसून हे फक्त माजी आमदार निर्मला गावित यांच्याच कार्याची जादू आणि स्व. दादांची पुण्याईची ताकद आहे हे आकडेवारीतुन दिसून येते. म्हणूनच येणारी निवडणूक माजी आमदार निर्मला गावित यांना आमदार म्हणून तिसऱ्यांदा विधानसभेत पाठवण्यासाठी मैलाचा दगड ठरणार आहे.
१९८५ ला अर्स काँग्रेसचे शिवराम झोले, १९९० ला भाजपचे यादवराव बांबळे, १९९५ ला काँग्रेसचे शिवराम झोले, १९९९ ला शिवसेनेचे पांडुरंग गांगड २००४ ला शिवसेनेचे काशिनाथ मेंगाळ निवडून आले होते. ह्या २५ वर्षात इंदिरा काँग्रेसला फक्त एकदाच यश मिळू शकले. २ वेळा शिवसेना, १ वेळा भाजपा, १ वेळा अर्स काँग्रेसला विजय मिळवता आला. ५ पैकी फक्त १ पंचवार्षिक निवडणुकीत इंदिरा काँग्रेस विजयाकडे पोहोचली. मग ह्या मतदारसंघाला काँग्रेसचा बालेकिल्ला कसा म्हणायचं? म्हणूनच २००९ च्या निवडणुकीत इगतपुरी तालुक्याचे लोकनेते स्व. गोपाळराव तथा दादासाहेब गुळवे आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री स्व. माणिकराव गावित यांनी त्यांची कन्या निर्मला गावित यांना काँग्रेसतर्फे आखाड्यात उतरवले. नाशिक मनपाच्या १० वर्ष नगरसेविका म्हणून सर्वोत्तम कामगिरी आणि वैतरणा भागात आपल्या एनजीओ मार्फत केलेल्या सिंचनाच्या यशस्वी योजना पाहून स्व. दादांनी त्यांना काँग्रेसचे तिकीट दिले. २३. ४६ टक्के म्हणजेच २९ हजार १५५ मते मिळवून निर्मला गावित पहिल्यांदा आमदार झाल्या. ३१. ४५ टक्के मतांमध्ये वृद्धी होऊन २०१४ मध्ये सर्वत्र मोदी लाट असतांनाही ४९ हजार १२८ मतांनी सौ. गावित दुसऱ्यांदा आमदार झाल्या. २०१२ पूर्वी इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर पंचायत समितीमध्ये सत्ता नव्हती. निर्मला गावित यांनी करिष्मा करून दाखवत दोन्हीही तालुक्यात काँग्रेसची सत्ता आणून दाखवली. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद संपत सकाळे यांच्याकडे खेचून आणत ताकद दाखवली. २०१९ मध्ये त्यांनी तिसऱ्यांदा आमदार होऊ नये म्हणून जवळपास सगळ्याच विरोधकांची एकजूट झाली.
२०१४ च्या निवडणुकीत पराभूत उमेदवार शिवराम झोले यांना ३८ हजार ७५१, हिरामण खोसकर यांना २१ हजार ७४७, काशिनाथ मेंगाळ यांना १७ हजार १६७, खाडे साहेब यांना ११ हजार २५०, संदीप जाधव यांना ६ हजार ८७६ मते मिळाली होती. ह्या सर्वांची एकत्रित मते ९५ हजार ७९१ होतात. याच सर्व मतांच्या जोरावर निर्मला गावित यांची तिसरी आमदारकीची टर्म आणि त्यांचा करिष्मा संपवण्यासाठी २०१९ ला सगळे विरोधक काँग्रेसचे विद्यमान आमदार हिरामण खोसकर यांच्या पाठीशी उभे राहिले. सर्व विरोधकांची एकत्रित मिळून ९५ हजार ७९१ पेक्षा जास्त मते हिरामण खोसकर यांना मिळायला काहीच अडचण नव्हती. असे असतांना श्री. खोसकर यांना विरोधकांची ९ हजार २३० मते कमी मिळाली. ८६ हजार ५६१ मते मिळून ते विजयी झाले. निर्मला गावित यांना ५५ हजार ०६ मते मिळून त्यांच्या नेहमीच्या मतांत जवळपास ६ हजार मतांची वाढ झाली. त्यांना मिळणाऱ्या मतांची टक्केवारी सुद्धा वाढून ती ३२. ८६ टक्के झाली. याचा अन्वयार्थ लावला तर आजही माजी आमदार निर्मला गावित यांची इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघावर चांगलीच पकड आहे. हा मतदारसंघ इंदिरा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचा दूधखुळा समज वरील सगळी आकडेवारी इतिहास पाहता गैरसमज असल्याचे स्पष्ट होते. काही दिवसात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार निर्मला गावित उतरणार असून या आधीच्या निवडणुकीपेक्षा अधिकाधिक मतांनी विजयी होऊन आपली जादू पुन्हा एकदा सर्वांना दाखवतील असे म्हणता येईल.