प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुका काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला असुन यापुढेही तो बालेकिल्लाच राहणार आहे. मात्र इगतपुरी तालुक्यात काँग्रेसमध्ये वरिष्ठ नेत्यांकडून हस्तक्षेप केला जात आहे. मागील गेल्या मोदी लाटेमध्ये नाशिक जिल्ह्यातील १५ मतदारसंघांमध्ये केवळ इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघांमध्ये फक्त काँग्रेसचा आमदार निवडून आला. त्या अनुषंगाने इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभेमध्ये सर्व स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या वतीने काम करणारा उमेदवार काँग्रेसने दिला पाहिजे. वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक कर्यकर्त्यांना विश्वासात नाही घेतले तर इगतपुरीमध्ये देखील सांगली पॅटर्न राबवला जाईल अशी भूमिका इगतपुरी तालुक्यातील काँग्रेसच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी यावेळी घेतली. इगतपुरी तालुक्यात प्रदेश काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचा काँग्रेसमध्ये जर हस्तक्षेप झाला तर इगतपुरी तालुक्यात काँग्रेसचा उमेदवार पडल्याशिवाय राहणार नाही. अशी भुमिका यावेळी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतली आहे. तालुक्यामध्ये स्व. लोकनेते गोपाळराव गुळवे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष वाढला असून त्यांचेच कार्यकर्ते आज काँग्रेसमध्ये काम करत आहेत. गुळवे यांच्या विचारसरणीनेच अनेक वर्षापासून इथे काँग्रेसचाच आमदार होत आहे. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेसच्या इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघांमध्ये हस्तक्षेप करू नये. या ठिकाणी राहुल गांधी यांना मानणारा काँग्रेसचा वर्ग असून राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक पातळीवर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची भूमिका स्पष्ट घेऊन निर्णय घेतले पाहिजे असा सूर सर्व पदाधिकाऱ्यांनी गोंदे येथे झालेल्या बैठकीत व्यक्त केला.
गोंदे दुमाला येथे इगतपुरी तालुका काँग्रेस पक्षाची सहविचार आढावा बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी घोटी बाजार समितीचे माजी सभापती गणपत पाटील राव हे होते. तर व्यासपीठावर काँग्रेस नेते रमेश जाधव, माजी तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे, खंडेराव भोर, किसान सेलचे सुदाम भोर, उपसभापती संपत वाजे, कारभारी नाठे, माजी उपसभापती शिवाजी शिरसाठ, कार्याध्यक्ष अरुण गायकर, युवा नेते लक्ष्मण गोवर्धने, रमेश देवगिरे, उत्तम शिंदे, ॲड. जी. पी. चव्हाण, संपत मुसळे, पंढरी बऱ्हे, कमलाकर नाठे, डॉ. महेंद्र शिरसाठ, दशरथ आहेर, तुकाराम वारघडे आदींसह मान्यवर उपस्थित होते. पांडुरंग शिंदे यांनी यावेळी गोपाळराव गुळवे यांनी वाढवलेल्या काँग्रेस पक्षाच्या विचारांना तडा जाणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले. माजी तालुकाध्यक्ष रमेश जाधव म्हणाले की, इगतपुरी तालुका काँग्रेस पक्ष हा लोकनेते गोपाळराव गुळवे यांच्या कार्यकाळात वाढला असून त्यांनीच या तालुक्यात आमदार घडविले आहे आज राज्यात महाविकास आघाडी असून आपल्या तालुक्याचे नेते ॲड. संदीप गुळवे हे देखील काँग्रेसचे विद्यमान आमदार हिरामण खोसकर यांनाच पाठिंबा देत असल्याचे सांगितले. इगतपुरी तालुक्याचा काँग्रेसचा उमेदवार हा इगतपुरी तालुका काँग्रेसच ठरवणार असुन इतर जिल्ह्यांतील कुणीही यात हस्तक्षेप करू नये असे सांगितले. यावेळी खरेदी विक्री संघाचे माजी उपाध्यक्ष जयराम धांडे, दिलीप पाटील, त्र्यंबक गुंजाळ, तुकाराम सहाणे, समाधान गुंजाळ, मधुकर सहाणे, भरत कातोरे, गुलाब वाजे, किसन नाठे, भाऊसाहेब धोंगडे, प्रकाश नाठे, गोरख वाजे, उत्तम बिन्नर, संपत धोंगडे, विनायक लाड, रामदास जमधडे, दशरथ जमधडे, बाळु धांडे, गोकुळ राव, माणिक राव यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन रमेश देवगिरे, लकी गोवर्धने यांनी केले.
याबाबत ॲड. संदीप गुळवे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनीही काँग्रेसला असलेले पोषक वातावरण व त्यात महाविकास आघाडीची भर यामुळे ही विधानसभा निवडणुकही आमदार हिरामण खोसकर यांना पोषक राहणार असल्याचे सांगितले.