भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – दारिद्र्याच्या दशावताराचे चटके सोसत सोसत न संपणाऱ्या संकटांला क्षणाक्षणाला तोंड देणे हे ऐऱ्या गैऱ्याचे काम नाही. तरीही सातत्याने अपयशाची रोजची मालिका बंद पडली नाही. पण संकटांच्या ढिगाऱ्यावर उभा राहून मी माझ्या ध्येयसिद्धीची वाटचाल पूर्ण करणारच, मी यशस्वी होऊन दाखवणारच हा संकल्प मनात पक्का केला. शेवटी संकटे, अपयश, दारिद्र्य पराभूत झाले. यशाला गवसणी घालून संपूर्ण कुटुंबाची मान, गावाचा मान वाढवणाऱ्या ज्ञानेश्वर शिंगोटे यांची ही यशकथा आहे. इगतपुरी तालुक्यातील घोटी खुर्द गावातील ज्ञानेश्वर एकनाथ शिंगोटे हे भारतीय सैन्य दलातील २४ वर्षाच्या प्रदीर्घ देशसेवेतून नुकतेच निवृत्त झाले. २४ वर्षाआधी ज्ञानेश्वर शिंगोटे यांच्यासह त्यांच्या कौटुंबिक परिस्थितीचा आणि विद्यमान परिस्थितीचा मागोवा घेणे आवश्यक आहे. यामुळे अनेक युवकांना यशस्वी होण्यासाठी प्रेरणा मिळाल्याशिवाय राहणार नाही. संकटांनी खचून न जाता परिस्थितीवर विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांसाठी शिंगोटे यांची यशोगाथा प्रेरणादायी आहे. तरुणांना ज्ञानेश्वरच्या यशकथेतून प्रेरक आदर्श मिळतो. जीवनात यश मिळवण्यासाठी इयत्ता पाचवी ते बारावीपासूनच ध्येय निश्चित करायला पाहिजे. त्यासाठी जाणकारांचे मार्गदर्शन, अखंड अभ्यास आवश्यक आहे. आईवडील आणि कुटुंबाला समृद्धी मिळून सुखाचा सागर देण्यासाठी अविरत प्रयत्न करायला हवेत. मोबाईल इंटरनेट इंस्टाग्राममध्ये रिल्स रिल्स बनवून किंवा पाहून आपले आयुष्य बदलत नसते. त्यासाठी खऱ्याखुऱ्या जीवनात ज्ञानेश्वर प्रमाणे जीवनाचे रिल्स बनवावे लागतात. आपले ध्येय निश्चित करा, ते पूर्ण करण्यासाठी ज्ञानबाप्रमाणे तुटून पाडा आणि ते मिळवल्याशिवाय मागे फिरू नका असे मत सामाजिक कार्यकर्ते आत्माराम फोकणे यांनी व्यक्त केले.
घोटी खुर्द येथे अतिशय गरीब कुटुंबामध्ये ज्ञानेश्वर विठोबा शिंगोटे यांचा जन्म झाला. सर्वजण त्यांना लाडाने ज्ञानबा म्हणत असत. त्यांचे आजोबा कै. विठोबा शिंगोटे यांच्यानंतर कुटुंबाची जबाबदारी आजी जनाबाई, वडील एकनाथ, चुलते तुकाराम, आई सावित्राबाई, चुलती अंजना यांच्यावर पडली. भाऊ संपत, उमेश व बहिणी असा त्यांचा मोठा परिवार आहे. त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती अतिशय नाजूक होती. अक्षरष: त्यावेळेस जात्यावर पीठ दळावे लागत असे. इतक्या मोठ्या कुटुंबाला राहायला घरही अपुरे पडत होते. पावसाळ्यात पर्यायी गोठ्यात जाऊन झोपावे लागत असे. ज्ञानबाच्या जीवनात अतिशय हलाकीचे दिवस होते. त्याला गाई म्हशी चारायला पाठवले जात असे. त्यातून येणाऱ्या दुधावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असे. ज्ञानेश्वरने मला सैन्य दलात भरती व्हायचं पहिल्यापासूनच निश्चित केले होते. यासाठी पहाटे लवकर उठून पाच दहा पंधरा किलोमीटर रनिंग करणे, व्यायाम करणे, पोहणे हे ज्ञानेश्वरचे दिनक्रम असायचे. ज्ञानेश्वरच्या अंगी असलेली जिद्द व चिकाटी अतिशय कौतुकास्पद होती. दुर्दैवाने ज्ञानेश्वर दहावीत अनुत्तीर्ण झाला तरी न थांबता त्याने मार्च ऑक्टोबरच्या परीक्षा दिल्या. तत्कालीन अभ्यासक्रम अत्यंत अवघड स्वरूपाचा होता. तरीही चिकाटीने खूप अभ्यास करून सर्व विषयात तो पुन्हा उत्तीर्ण झाला. भरतीसाठी लागणारा जातीचा दाखल्यासाठी त्याने अनेकदा घोटी खुर्द ते इगतपुरी असा सायकलने प्रवास केला. शरीर यष्टी मजबूत व कणखर असतांना त्याने आज पर्यंत कुणाशी कधीही वाद विवाद केला नाही, आपल्या ताकतीचा गर्व दाखवला नाही. मला आयुष्यात काहीतरी करायचंय हे एकच ध्येय त्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाले होते. अनेक संकटे आणि पराभवांचा सामना करून शेवटी त्याची जिद्द व चिकाटी कामाला आली. २४ वर्षांपूर्वी ज्ञानेश्वर भारतीय सैन्य दलात भरती झाला. ज्ञानेश्वर सैन्यात रुजु झाल्यानंतर त्याने आपल्या कुटुंबाकडे लक्ष देण्याला प्राधान्य दिले. सर्वप्रथम त्याने नवीन घराचे बांधकाम केले. कुटुंबातील सर्वांसाठी वेळोवेळी त्याने आवश्यक ती सर्व मदत केली. परिस्थितीच्या छाताडावर बसून विलक्षण प्रगती साधली. स्वतःबरोबरच चुलता, चुलती, आई वडील, आजी सर्वांची काळजी घेत स्वतःसाठी सुद्धा विजयनगर देवळाली कॅम्प येथे बंगला घेतला. मोडकी सायकल जाऊन त्याच्या घरासमोर आलिशान चारचाकी उभी आहे. आज त्याची मुले उच्च शिक्षण घेत आहेत. निवृत्त जीवनात अधिकाधिक तरुणांना आवश्यक ते मार्गदर्शन देण्यासाठी बांधील असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.