इगतपुरीनामा न्यूज : श्री स्वामी समर्थ अनुसूचित जाती महिला सहकारी सूतगिरणी इगतपुरीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. सामाजिक न्याय विभागाकडून कर्ज उपलब्ध झाल्यामुळे यंत्रसामग्री १ ऑक्टोंबरपासून येण्यास सुरवात होणार आहे. उर्वरित लागणाऱ्या लिंक कोनर मशीन वस्त्रोद्योग विभागाच्या उर्वरित भागभांडवलामधून व सामाजिक न्याय विभागाच्या उर्वरित कर्जामधून यंत्रसामुग्री खरेदी केली जाईल. पुढील वार्षिक सर्वसाधारण सभेपुर्वी ही सूतगिरणी उत्पादनाखाली आलेली दिसेल अशी माहिती संस्थेचे संस्थापक व हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे भाजप-जनसुराज्य पक्षाचे नेते जिल्हा परिषद सदस्य दलितमित्र डॉ. अशोकराव माने बापू यांनी दिली. या प्रकल्पासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, ना. अजितदादा पवार, वस्त्रोद्योग मंत्री ना. चंद्रकांत दादा पाटील, माजी मंत्री विनय कोरे ( सावकार ) यांनी व्यक्तिशः लक्ष घालून आवश्यक मदत करण्याचे अभिवचन दिले आहे, त्यामुळे शेकडो बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी ही सूतगिरणी राज्यात आदर्शवत ठरेल असेही ते यावेळी म्हणाले. संस्थेच्या चेअरमन डॉ. नीता अभिजित माने सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या.
श्री स्वामी समर्थ अनुसूचित जाती महिला सहकारी सूतगिरणी इगतपुरी या संस्थेची २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात नुकतीच पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघाचे कार्यकारी संचालक रामचंद्र मराठे, वास्तुविशारद श्रीकांत पाटील, पत्रकार भास्कर सोनवणे, टेक्सटाईल एक्स्पर्ट अमर पाटील, तांत्रिक सल्लागार गणेश वंडकर, कोकण रेल्वेचे माजी मुख्य अभियंता दीपक दिवटे, ओएनजीसी चे कार्यकारी अभियंता विजय ननावरे यांनी मनोगत व्यक्त केले. विषय पत्रिकेचे वाचन संस्थेचे कार्यकारी संचालक सुहास राजमाने यांनी केले. यावेळी सभासदांनी हात उंचावून सर्व विषयांना एकमताने मंजुरी दिली. सभेप्रसंगी रेखा माने, व्हॉइस चेअरमन संघमित्रा गजरे, संचालिका रजनी रोकडे, सुनीता चव्हाण, रुपाली राजमाने, कु. श्रेयष्टी सोनवणे, शिल्पा रोकडे, विद्या सोनवणे, संपदा गजरे, शुभांगी रोकडे, निवृत्त पोलीस अधीक्षक विलास भोसले, इलेक्ट्रिकल काँट्रॅक्टर गणेश देशपांडे, दत्तू काळे, सुरेश बोराडे, अंकौटंट संतोष माने यांच्यासह महिला सभासद, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेच्या संचालिका रुपाली राजमाने यांनी उपस्थितांचे आभार मानले.