ह. भ. प. सूर्यकांत महाराज सहाणे ( भागवताचार्य )
साकुर, ता. इगतपुरी, जि. नाशिक
संपर्क : 8975809654
बघा, मुलांचे नाव देवाच्या नावा प्रमाणे ठेवल्याचा फायदा काय होतो ? प्राचीन काळी कान्यकुब्ज नगरीत अजामेळ नावाचा एक तरुण ब्राह्मण राहत असे. तो आपली सर्व धार्मिक कर्म उत्तम रीतीने पार पाडीत असे. त्याच्या सुंदर बायकोसह तो सुखाने संसार करीत असे. पण दुर्देवाने तो एका वेश्येच्या मोहात पडला आणि आपला धर्म सोडून तो वाईट मार्गाला लागला. तो चोऱ्या करू लागला, जुगार खेळू लागला. त्याला त्या वेश्येपासून दहा मुले झाली. त्यातल्या धाकट्या मुलावर त्याचे फार प्रेम होते. कसे कुणास ठाऊक, त्या मुलाचे नाव त्याने श्री विष्णूचे नाव जे नारायण ते ठेवले. जेव्हा तो वयोवृद्ध झाला आणि त्याचा मृत्यू जवळ येऊन ठेपला. यमराजाचे यमदूत हातात जाड दोर घेऊन त्याला यमलोकी न्यावयास आले. त्यांचे ते अक्राळ-विक्राळ चेहरे पाहून अजामेळ घाबरला आणि आपल्या धाकट्या मुलाला हाका मारू लागला. नारायण, नारायण, नारायण! त्याच्या मुखातून चाललेला तो गजर ऐकताच चार दिव्य विष्णुदूत तिथे आले आणि मग अजामेळाला कुठे न्यावयाचे याबद्दल त्यांच्यात आणि यमदूतांत वाद सुरू झाला. पण मरतेसमयी भगवंताचे नाव मुखात आल्यामुळे विष्णुदूतांना त्याला यमदूताच्या तावडीतून सोडवता आले. पुढे गंगाकिनारी हरिद्वार येथे भक्तियोग आचरीत असताना त्याला मृत्यू आला आणि विष्णुदूत त्याला विष्णुलोकांत घेऊन गेले. जन्ममरणाच्या फेऱ्यातून त्याची कायम सुटका झाली. कोणत्याही निमित्ताने का होईना पण केवळ शेवटच्या क्षणी भगवंताचं नाव मुखात आल्यामुळे. म्हणुन आपण पण आपल्या मुला- मुलींचे नाव काहीतरी बंटी, पिंट्या,पप्या, ठेवण्यापेक्षा त्याला देवाचे नाव द्या. आणि आपलाही उद्धार करून घ्या..! रामकृष्णहरी
( भागवताचार्य चि. सूर्यकांत महाराज सहाणे यांचे भागवत प्रशिक्षण श्री धाम वृंदावन मथुरा उत्तर प्रदेश येथे झालेले असून ते लोकप्रिय कीर्तनकार सुद्धा आहेत. ]