लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – अनेक संकटे झेलत संसाराला हातभार लावणाऱ्या अनेक महिलांना रोजगार मिळण्यासाठी नेहमीच अडथळ्यांची शर्यत करावी लागते. याप्रकारे रोजगाराच्या शोधात असलेल्या इगतपुरी तालुक्यातील शेकडो निराधार महिलांसह गरीब परिस्थिती हलाखीचे जीवन जगणाऱ्यांना सामाजिक कार्यकर्ते तुकाराम वारघडे यांनी रोजगार मिळवून दिला आहे. याबद्धल महिलांकडून तुकाराम वारघडे यांचे आभार मानले जात आहेत. गरजू महिलांना अनेक कंपन्यांचे उंबरठे झिजवून सुद्धा काम मिळत नव्हते. यामुळे महिलांनी काम मिळावे यासाठी श्री. वारघडे यांच्याकडे कैफियत मांडल्यानंतर त्यांनी तात्काळ पुढाकार घेऊन गोंदे दुमाला येथील औद्योगिक वसाहतीतील काही कंपन्यांकडे पाठपुरावा केला. त्याला यश येऊन महिलांच्या हाताला आता काम मिळाले आहे.
समाजातील विकासाचा महत्वाचा घटक म्हणजे महिला आहेत. कोणताही विकास हा महिलांच्या प्रगतीबरोबर होणे शक्य आहे. महिलांना रोजगार मिळवून देऊन सक्षम करणे गरजेचे आहे. महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी तत्पर असणार आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक महिलेला आपल्या हक्काची, अधिकाराची, समस्याची जाणीव झाली पाहिजे. आगामी काळात रोजगार नसलेल्या महिलांसाठी व सुशिक्षित बेरोजगारांच्या रोजगारासाठी प्रयत्न करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते तुकाराम वारघडे यांनी सांगितले. इगतपुरी तालुक्यातील शेकडो महिलांना हक्काचा रोजगार मिळवून दिल्याबद्धल तुकाराम वारघडे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.