इगतपुरीनामा न्यूज – तालुका कृषी अधिकारी कार्यालय इगतपुरी यांच्या मार्फत इगतपुरी तालुक्यात २४ जून ते १ जुलै दरम्यान “कृषी संजीवनी’ सप्ताह साजरा करण्यात येत असून या सप्ताहात शेतकऱ्यांना शेती संदर्भात विविध विषयावर कृषी विभागामार्फत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी रामदास मडके यांनी केले आहे. कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कृषी संजीवनी सप्ताहात कृषी पिक तंत्रज्ञान दिन पौष्टीक आहार प्रसार दिन, कृषी महिला शेतकरी सन्मान दिन, जमीन सुपिकता जागृती दिन, कृषी क्षेत्राची भावी दिशा, कृषी प्रक्रिया तंत्रज्ञान प्रसार दिन याप्रमाणे २५ ते ३० जून दरम्यान विविध कार्यक्रम होणार आहेत.
२५ जूनला तालुक्यातील धामणी, दौंडत, राहुलनगर, शेनवड बुद्रुक, शिरेवाडी, घोटी खुर्द, पिंपळगाव डुकरा, धामणगाव, त्रिंगलवाडी, भावली बुद्रुक, तळोशी, लहांगेवाडी, नागोसली, बळवंतनगर, कांचनगाव, खंबाळे इत्यादी गावांमध्ये कार्यक्रम घेऊन सप्ताहाला प्रारंभ झाला. सप्ताहाचा समारोप हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जन्मदिवशी १ जुलैला होणार आहे. २७ जूनला कृषी महिला शेतकरी सन्मान दिन या कार्यक्रमास घोडेवाडी येथे होणाऱ्या कार्यक्रमाला नाशिक विभागाचे विभागीय कृषी सह संचालक मोहन वाघ उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत.
कृषी संजीवनी' सप्ताहात कृषी विभागाचे कर्मचारी, अधिकारी गावात येऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना यावेळी मिळणार आहे. कृषी तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्याचा कृषी विभागाच्या आहे. तरी शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा.
- किशोर भरते. कृषी पर्यवेक्षक इगतपुरी