इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील धारगांव येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ( आत्मा ) मार्फत परंपरागत कृषी विकास योजनेत सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. प्रशिक्षणानुसार शेतकऱ्यांचे शेतकरी गट तयार करून विषमुक्त अन्न तयार करण्याकडे वाटचाल, चांगला ग्राहक निर्माण करून आर्थिक उत्पादन वाढविणे यासाठी काम करण्यात येणार आहे. इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी शितलकुमार तंवर यांनी योजनेची प्रस्तावना केली. जिल्ह्यात परंपरागत कृषी विकास योजना ( सेंद्रिय शेती ) मध्ये २५ शेतकरी गट तयार करण्यात येणार आहे. त्यात इगतपुरी तालुक्यातील १५ शेतकरी गट व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील १० शेतकरी गटाचे १ क्लस्टर तयार करण्यात येणार आहे. आत्माचे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम यांनी योजनेबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. गटाच्या माध्यमातून सेंद्रिय निविष्ठा निर्माण करणे अर्थात दशपर्णी, जीवामृत, कंपोस्ट खते तयार करण्यात येणार आहे. आत्माच्या प्रकल्प उपसंचालक वंदना शिंदे यांनी ही योजना पुढील ३ वर्ष सुरू राहणार असल्याने विविध विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.
एपीओएफ ऑरगॅनिक सर्टिफिकेशन एजन्सीचे बाळासाहेब खेमनार यांनी योजनेतील प्रमाणीकरण बाबत माहिती दिली. तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक रावसाहेब पाटील, हितेंद्र मोरे यांनी गट निर्मिती व शेतकरी उत्पादक कंपनी निर्मितीबद्धल माहिती दिली. तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक निलेश चौधरी, महेंद्र सोनवणे यांनीही मार्गदर्शन केले. प्रगतशील शेतकरी दशरथ भवारी, गणपत वाळू झोले यांनी आपल्या मनोगत व्यक्त करून गट निर्मितीचे आश्वासन दिले. कार्यक्रमाप्रसंगी धारगांवचे सरपंच निवृत्ती पादिर, उपसरपंच श्रीराम रणमाळे उपस्थित होते. कार्यक्रमासाठी दोन्ही तालुक्यातील विविध गावाचे सेंद्रिय शेती करणारे शेतकरी उपस्थित होते. इगतपुरीचे मंडळ कृषी अधिकारी मनोज रोंगटे, त्र्यंबकेश्वरचे मंडळ कृषी अधिकारी रामा दिघे, कृषी पर्यवेक्षक अनिल मुजगुडे, श्री. निकम, कृषी सहाय्यक एम. टी. महाले, होंडे, वैतरणा ऑरगॅनिक फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक मंडळ, ग्रामस्थ आणि शेतकरी उपस्थित होते. सूत्रसंचालन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक रावसाहेब पाटील यांनी तर आभार प्रदर्शन मनोज रोंगटे यांनी केले.