
इगतपुरीनामा न्यूज, दि. १ – डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या सौजन्याने बुधवारी संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा व तालुका स्तरावरील सरकारी कार्यालयांची आवारे व शहरातील प्रमुख रस्त्यांची साफसफाई करण्यासाठी स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या स्वच्छ भारत अभियान मोहिमेचे स्वच्छतादूत म्हणून राज्यपालांनी डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्र सरकारने २०१७ रोमध्ये पद्मश्री पुरस्कार जाहीर केला. डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानाच्या सौजन्याने गेली अनेक वर्षे व्यापक स्वरूपात स्वच्छता अभियान राबविण्यात येत असून १६ नोव्हेंबर २०१४ च्या स्वच्छता अभियानाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.
डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंती निमित श्री सदस्यांनी शहरातील सर्व कार्यालयांची आवारे व प्रमुख रस्ते स्वच्छ करण्यात आले. स्वच्छता मोहिमेत सुमारे २ टन कचरा इगतपुरी नगर परिषदेच्या सहाय्याने डम्पिंग ग्राउंड पर्यंत पोहोचवण्यात आला. ह्या मोहिमेत अंतर्गत ७ एकर परिसर स्वच्छ करण्यात आला. तहसीलदार कार्यालय इगतपुरी, पंचायत समिती इगतपुरी, पोलीस स्टेशन इगतपुरी आदी सरकारी कार्यालयांची स्वच्छता करण्यात आली. ह्या अभियानात शहर व तालुक्यातील ७६ श्री सदस्यांनी सहभाग नोंदवला. हे संपूर्ण अभियान अंमलात आणताना प्रशासनाच्या सहकार्याने परंतु कोणताही अतिरिक्त बोजा पडणार नाही याची दक्षता घेण्यात आली. पोलीस स्टेशन मधील अधिकारी व कर्मचारी, नगरसेवक यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. हातमौजे, झाडू, मास्क, कचरा उचलण्याचे साहित्य प्रतिष्ठानतर्फे पुरवण्यात आले. प्रतिष्ठानची स्वच्छता मोहीम कौतुकास्पद असल्याचे मत अधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केले.
