इगतपुरीनामा न्यूज, दि. ११ – ‘शिक्षक ध्येय’ महाराष्ट्र आणि ‘मातृसेवा फाउंडेशन’ ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील महिलांसाठी ‘कर्तृत्ववान महिला पुरस्कारासाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांच्या कार्याला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. ‘शिक्षक ध्येय’चे राज्यात सुमारे तीन लाखापेक्षा जास्त शिक्षक, पालक आणि विद्यार्थी वाचक वर्ग आहे. महिलांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील इतर सर्व नागरिकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नाविन्यपूर्ण प्रयोगाच्या आधारावर उपक्रमाची निवड केली जाणार आहे. राज्यातील उपक्रमशील, कर्तृत्ववान महिलांनी या स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन ‘शिक्षक ध्येय’चे संपादक मधुकर घायदार, मातृसेवा फाउंडेशनच्या संस्थापिका संध्या ( सामंत ) सावंत, कार्यकारी संपादक प्रभाकर कोळसे, डॉ. माधव गावीत, सुधाकर जाधव, शिक्षक ध्येयच्या संपादकीय मंडळाने केले आहे.
‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर आधारित हा पुरस्कार देण्यात येणार असून महिलांच्या कार्याला उत्तेजन देणे, त्यांचे कौतुक करून, प्रोत्साहनासह त्यांच्यातील कर्तृत्व वाढीस लावणे हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. उपक्रम/प्रस्ताव अहवाल लेखनाविषयी अधिक सविस्तर माहिती www.shikshakdhyey.in या संकेतस्थळावर वाचावी.
उपक्रम सादर करण्याची अंतिम तारीख २८ फेब्रुवारी २०२३ आहे. विजेत्या महिलांना सन्मानचिन्ह ( ट्रॉफी ), सन्मानपत्र ( प्रिंट प्रमाणपत्र ) आणि शिक्षक ध्येयची प्रिंट मासिके घरपोच देण्यात येईल. सर्व सहभागी महिलांना डिजिटल सहभाग प्रमाणपत्र ईमेलवर पाठवण्यात येईल. दर्जेदार आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची निवड केली जाईल. ८ मार्चला ‘जागतिक महिला दिनी’ साप्ताहिक शिक्षक ध्येयमध्ये निकाल जाहीर करण्यात येईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
निकाल लागल्यानंतर वाद घालण्याची सवय असलेल्यांनी यात सहभागी होऊ नये असे कळवण्यात आले आहे.