धक्कादायक : शिरसाठे गावातून २ बालकांना पळवण्याचा अज्ञातांकडून प्रयत्न : शिरसाठेचे भोरू सदगीर यांनी सावध राहण्याचे केले आवाहन

इगतपुरीनामा न्यूज, दि. २० – गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता इगतपुरी तालुक्यातील शिरसाठे गावापासून अर्धा किलोमीटर दूरवर शिरसाठे येथील शाळकरी विद्यार्थी युवराज ज्ञानेश्वर सदगीर वय १०, कपिल काशिनाथ सोपनर वय १२ हे खेळण्यासाठी गेले होते. ह्या दोन बालकांना तिथून दोन अज्ञात व्यक्तींनी तोंड दाबून काळ्या स्विफ्ट गाडीत घातले. तिथून त्यांनी गाडी पुढे कुशेगावकडे नेली परंतु तिकडून बाहेर निघण्यासाठी रस्ता नसल्यामुळे ते परत त्याच रस्त्याने त्या मुलांना घेऊन गेले. मुले आरडाओरडा करण्याचा प्रयत्न करत होते. परंतु त्या व्यक्तीकडून दोन्ही मुलांना गप्प राहण्यासाठी मारहाण करण्यात येत होती. संबंधित शाळकरी विद्यार्थ्यांशी शिरसाठे येथील युवक भोरू सदगीर यांनी संवाद साधून माहिती घेतली. “इगतपुरीनामा” कडे याप्रकरणी त्यांनी माहिती दिली आहे. याबाबत पोलिसांकडे तक्रार केली नसली तरी सावधानता बाळगावी असे आवाहन भोरू सदगीर यांनी केले आहे.

भोरू सदगीर यांनी पुढे सांगितले की, नंतर ते बालकांना घेऊन त्र्यंबकेश्वरजवळ पहिने येथे जातांना त्या व्यक्तींनी पोलिसांना पाहिले. गाड्यांची पोलिसांकडून तपासणी सुरु असल्याने गाडी मागे वळवून पोलिसांना ते घाबरले. त्यामुळे या दोन्ही बालकांना गाडीतून उतरवून दिले. जाताना सांगितले की आम्ही परत येऊ. त्यानंतर मुलांनी रस्त्याने जाणाऱ्या दिंडीतील भाविकांना हा प्रकार सांगितला. आम्हाला वाचवा आमच्या घरी फोन करा असे सांगितले. नंतर घरच्यांशी संपर्क झाल्यानंतर दोन्ही मुले घरच्या व्यक्तींच्या ताब्यात मिळाली. ह्या घटनेमुळे शिरसाठे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. कोणी अनोळखी व्यक्ती, अनोळखी गाडी दिसल्यास बारकाईने लक्ष ठेवावे. काही संशयास्पद वाटल्यास पोलिसांना कळवावे असे आवाहन भोरु सदगिर यांनी केले आहे.

Similar Posts

error: Content is protected !!