लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. २६ – पाणी हे जीवन असून पाण्याचा एक थेंब खूप महत्वाचा आहे. पिण्याचे पाणी नसल्यास अनेक हाल सहन करावे लागतात. गोरगरीब रुग्णांच्या सेवेसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले याचा मनस्वी आनंद वाटत आहे. म्हणून पाणी जपून वापरणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन माजी सभापती सोमनाथ जोशी यांनी केले. काननवाडी येथे पिण्याच्या पाण्याच्या जलकुंभाचे, जलवाहिनीचे भूमिपूजन झाले. यावेळी श्री. जोशी पाण्याचे महत्व विशद करताना बोलत होते. इगतपुरी तालुक्यातील काननवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला पंचायत समितीचे माजी सभापती सोमनाथ जोशी यांच्या १५व्या वित्त आयोग सेस निधी योजनेअंतर्गत पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध झाल्याने गरीब रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक रुग्णांची नेहमीच विविध प्रकारची तपासणी, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया आदींसाठी मोठी गर्दी होत असते. मात्र पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्याने माजी सभापती जोशी यांनी तहानलेल्या गोरगरीब रुग्णांची गरज लक्षात घेतली. आरोग्य केंद्रात पाणी उपलब्ध करून दिल्याने गोरगरीब आदिवासी रुग्णांनी समाधान व्यक्त करून सोमनाथ जोशी यांचे आभार मानले. सेस निधीच्या माध्यमातून निवासी राहणाऱ्या रुग्णाच्या नातेवाईकांची पाण्याची सोय उत्तम रित्या होणार आहे. पाण्याची सुविधा मिळावी यासाठी ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, आरोग्य कर्मचारी यांची मागणी पूर्ण झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. कार्यक्रमावेळी सरपंच ज्ञानेश्वर करवर, सदस्य बाळू भांगरे, अशोक चिरके, संतोष बिन्नर, विजू दराणे, सुदाम बेडकोळी, डॉ. विश्वनाथ खतेले आदी उपस्थित होते.