इगतपुरीनामा न्यूज, दि. 4
खेड भैरव येथील शेतकरी मोहन रामनाथ वाजे या शेतकऱ्याने आपल्या 1 हेक्टर शेतात दप्तरी १००८ हे भात बियाणे लावले. मात्र त्याला कुसळ असलेले लोंबट आले असून या शेतकऱ्याची संपूर्ण मेहनत वाया गेली आहे. लागवडीचा खर्चही संपूर्ण पाण्यात गेल्याने संबंधित शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. कृषी विभाग व संबंधित भात बियाणे कंपनीला दुकानदारामार्फत कळवूनही कंपनीने कुठलीही दखल घेतली गेली नाही. कृषी विभागाने पहाणी करून नुकसानीचा पंचनामा सुद्धा केला आहे. मात्र अद्याप यावर कोणतीही कार्यवाही नाही. दफ्तरी बियाणे कंपनीकडून फसवणूक झाल्याने कंपनीवर गुन्हा दाखल करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.
नाशिकचे उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ वाघ, कृषी विद्यापीठ प्रतिनिधी सुरेश परदेशी, पंचायत समितीचे कृषी विकास अधिकारी के. एल. भदाणे, कृषी सेवा विक्रेता रमेश वाजे यांच्या तक्रार निवारण समितीने पंचनामा करून अहवाल दिला आहे. अहवालात लागवड केलेले दप्तरी १००८ हे संपूर्णपणे कुसळी भात आले असल्याचे नमूद आहे. त्यामुळे कंपनीचे दुर्लक्ष झाल्याने खूप मोठे नुकसान झाले असल्याने याबाबत न्याय मिळावा अशी मागणी शेतकरी मोहन वाजे यांनी केली आहे. न्याय न मिळाल्यास न्यायालयीन लढा द्यावा लागेल असे ते म्हणाले. संबंधित कंपनीने माझी फसवणूक केल्यामुळे माझा लागवडीचा खर्च वाया गेला. झालेल्या नुकसानीची पहाणी कृषी विभागाने केलेली असून संबंधित कंपनीवर कारवाई करून मला न्याय मिळणे गरजेचे आहे असे शेतकरी मोहन वाजे यांनी सांगितले.