इगतपुरीनामा न्यूज, दि. 17
इगतपुरी तालुक्यातील तारांगणपाडा येथील 1 जण नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असतांना मृत्यूमुखी पडला. सक्रू शंकर मेंगाळ वय 47 असे त्यांचे नाव असून शवविच्छेदन अहवाल मिळाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. दूषित पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात जुलाब आणि उलट्या झाल्यामुळे हा मृत्यू झाला असल्याची चर्चा गावात सुरु आहे. अनेक नागरिकांना काही दिवसापूर्वी जुलाब आणि उलट्यांचा त्रास होत असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातुन 11 पैकी 6 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून 5 जण उपचार घेत आहेत. इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख म्हणाले की, तारांगणपाडा गावात आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत आवश्यक ती सर्व दक्षता घेतली जात आहे. उपाययोजना सुरु असून याबाबत नियंत्रण आणण्यात आम्हाला यश आले आहे.
इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणि विविध खासगी हॉस्पिटलमध्ये बरेच रुग्ण दाखल आहेत. एकाच वेळेस पंधरा ते वीस जणांना जुलाब आणि उलट्यांचा त्रास सुरू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. अद्यापही पाण्याच्या नमुन्याच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. दूषित पाण्याच्या वापरामुळे ग्रामस्थांना हा त्रास होत असल्याची प्राथमिक माहिती आहे.