इगतपुरीनामा न्यूज, दि. २७
कल्याण येथून मंगला एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या ठाकुर कुटुंबातील ११ महिन्याच्या लहान मुलीची प्रकृती बिघडल्याने ते इगतपुरी रेल्वे स्थानकावर उतरले. जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण फलटणकर, मकसूद खलिफा व रहिम शेख यांना माहिती मिळताच त्यांनी मदतकार्य करण्याचा तात्काळ निर्णय घेतला. आजारी बाळाला ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी घेऊन गेले. ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर व सहकारी कर्मचाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न केले. मात्र बेबी ठाकूर या बाळाचा दुर्दैवी अंत झाला.
बाळाचे वडील फेरीवाले असल्याने ते वाडा येथे बाजारात होते. त्यांना यायला रात्री ९ वाजले. परंतु त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याने बेबी ठाकुर ह्या बाळाचा मृतदेह नेण्यासाठी त्यांना समस्या आली. त्यामुळे वैकुंठ मित्र मंडळ घोटी यांच्याकडून रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यासाठी जनसेवा प्रतिष्ठानने काम केले. प्रभारी लोहमार्ग पोलीस अधिकारी सचिन बनकर, नगरपालिकेचे मुख्याधिकारी पंकज गोसावी, डॉ. वानखेडे, ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी, सुरेंद्र गायकवाड, वैभव कुमठ आदींनी ह्या कामात सहाय्य केले.