इगतपुरीनामा न्यूज, दि. १४
विकासाचे पर्व, सामाजिक एकता, सुंदर गाव, सुंदर विचारांची माणसे आणि सुंदर इमारती अशी विविधांगी वैशिष्ट्य असणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील मोडाळे गावाच्या शिरपेचात आणखी एक तुरा लागणार आहे. नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत आर. आर. ( आबा ) पाटील तालुकास्तरीय प्रथम सुंदर ग्रामपंचायत पुरस्कार मोडाळे गावाला घोषित झाला आहे. उद्या स्वातंत्र्यदिनी नाशिक येथे होणाऱ्या सोहळ्यात पालकमंत्री आणि विभागीय आयुक्त यांच्या हस्ते गावाला पुरस्कार दिला जाणार आहे. यापूर्वी गावाने केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे अनेक मानाचे पुरस्कार पटकावलेले आहेत. मोडाळे गावकरी आणि पदाधिकारी यांच्या समन्वयामुळे मला माझ्या गावासाठी अजून अनेक योजना आणि पुरस्कार मिळवायचे आहेत. माझ्या गावाचा मला अभिमान वाटतो असे कौतुक जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यांनी केले आहे. सरपंच मंगला बोंबले, ग्रामसेवक नानासाहेब खांडेकर हे गावासाठी दिला जाणारा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते स्वीकारणार आहेत. गावकऱ्यांनी पुरस्काराची माहिती मिळताच आनंदोत्सव साजरा केला आहे.