रायगडनगर शाळेच्या धोकादायक इमारतीत ८३ आदिवासी विद्यार्थ्यांचे जीव मुठीत घेऊन शिक्षण : निकृष्ट बांधकाम करणाऱ्यांवर कारवाई करा – राया फाउंडेशन

लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ७

आदिवासी गोरगरीब मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन महत्वपूर्ण प्रयत्न करते. मुलांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याचीही दखल घेत असले तरी आदिवासी भागात मात्र जीव धोक्यात घालून विधार्थी शिक्षणाचे धडे गिरवत असल्याचे चित्र दिसत आहे. नाशिक मुंबई महामार्गावरील आदिवासी असणाऱ्या रायगडनगर येथील लोकसंख्या २ हजाराच्या आसपास आहे. येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत जीवघेणी बनत चालली आहे. ८३ आदिवासी मुलांना जीव मुठीत धरून शिक्षण घ्यावे लागते. जिल्हा परिषद शाळा इमारत निकृष्ट दर्जाची असून आदिवासी  विध्यार्थ्याच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. इमारतीला ठिकठिकाणी भेगा पडल्या असून सततच्या पावसामुळे येथील इमारतीच्या स्लॅबचा काही भाग वर्गात पडला. सुदैवाने  विद्यार्थ्यांना काही झाले नाही. येथे ८३ विद्यार्थी शिक्षण घेतात. ही इमारत अतिशय धोकेदायक बनली आहे. या कारणामुळे काल पासून शाळा बंद ठेवण्यात आली आहे.

सन 2010 ते 11 कालावधीत नाशिकचे मुख्य अभियंता आर धनाईत, इंजीनियर एस एन जाधव यांनी अतिशय निकृष्ट दर्जाची शाळेची इमारत बांधली असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते एकनाथ गोहिरे, आदिवासी क्रांतिकारक राया फाउंडेशनचे युवाध्यक्ष कृष्णा गोहिरे यांच्यासह ग्रामस्थानी  केला. संबंधितांसच ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणीही ग्रामस्थानी केली. सदर इमारत दरवर्षी पावसाळ्यात गळत असते. यामुळे मुलांना शिक्षण घेण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे. शिक्षक प्रल्हाद निकम यांच्या काळात शाळेचे काम झाले असल्याचे सांगण्यात आले. यावेळी गटशिक्षणाधिकारी मिता चौधरी यांनी इमारतीची पाहणी करून शेजारीच असलेल्या एका पत्र्याच्या खोलीत मुलांची शाळा भरवावी. सदर ठेकेदाराचा अहवाल वरिष्ठ यंत्रणेला सादर करणार असल्याचे सांगितले. शाळेने इमारत दुरुस्तीसाठी तीन चार वेळेस ग्रामपंचायतीला प्रस्ताव देखील दिला आहे. यावेळी सरपंच काळूबाई शिद, ग्रामसेवक गणेश पगारे, रामदास गोहिरे, रतन शिद, कृष्णा गोहिरे, समाधान मेंगाळ, सुनील पारवे, बाळू गोहिरे, रमेश पारवे, रुख्मिणी गोहिरे, तांबडू शिद, विजय गोहिरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

सदर इमारत अतिशय जीवघेणी असून आदिवासी विद्यार्थी मात्र येथे शिक्षण घेत आहेत. इमारतीला भेगा, चिरा पडल्या आहेत. कधी स्लॅब पडेल याचा भरवसा राहिलेला नाही. निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरणाऱ्या त्या ठेकेदारावर अधिकाऱ्यांनी कारवाई करावी. अन्यथा आदिवासी संघटना व सर्व ग्रामस्थांना घेऊन आंदोलन करू.
- कृष्णा गोहिरे, राज्य युवाध्यक्ष आदिवासी क्रांतिकारक राया ठाकर फाउंडेशन

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!