इगतपुरीनामा न्यूज, दि. ५
२६ एप्रिलला इगतपुरी तालुक्यातील वैतरणा धरणाजवळ धारगाव शिवारात एक २० ते ३० वर्षीय पुरूषाचा अर्धवट जळालेला मृतदेह मिळुन आला होता. मयत इसमाला कोणीतरी अज्ञात आरोपींनी अज्ञात कारणासाठी गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने गंभीर जखम करून जिवे ठार मारले. त्याचे प्रेत कोणाला दिसु नये म्हणुन त्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी वैतरणा धरणाजवळ जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला फेकुन देण्यात आले. सफेद रंगाच्या प्लॅस्टिकच्या गोण्या मृतदेहावर टाकुन जाळुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला म्हणुन घोटी पोलीस ठाण्यात भादवि कलम ३०२,२०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ह्या घटनेबाबत नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी तात्काळ दखल घेवुन गुन्ह्यातील मयताची ओळख पटविण्यासाठी नाशिक शहर व लगतच्या जिल्ह्यातील हरवलेल्या व्यक्तींची माहिती घेण्याबाबत पोलीस पथकास सुचना दिल्या होत्या. त्यानुसार मयत इसमाच्या फोटोवरून खबऱ्यांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार, मयत इसम मुजाहिद उर्फ गोल्डन अफजल खान, वय २३, रा. भारतनगर, वडाळा रोड, नाशिक असे असल्याचे निष्पन्न झाले. त्याप्रमाणे घोटी पोलीसांनी मयत इसमाबाबत सविस्तर माहिती घेतली असता, तो २५ एप्रिलपासून त्याचे काही साथीदारांसोबत एका कारमध्ये गेलेला असल्याचे समजले. त्यावरून पोलीस पथकाने नाशिक शहरातील संशयित नामे १) रामेश्वर उर्फ राम मोतीराम गर्दे, वय ३०, रा. स्नेह संकुल, अशोका मार्ग, नाशिक, २) सलमान उर्फ माम्या वजीर खान, रा. वडाळागाव,
नाशिक, ३) सदाशिव उर्फ शिव पाराजी गायकवाड, रा. वडाळागाव, म्हाडा कॉलनी, नाशिक यांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या इसमांना विश्वासात घेवुन चौकशी केली असता, त्यांनी त्यांचे आणखी एक साथीदारासह मयत इसम यास त्यांचेकडील स्कोडा सुपर्ब कार क्र. एमएच ०६. एव्ही ३३४४ या वाहनात बसवुन मुंबई आग्रा महामार्गावर मुंढेगाव शिवारात घेऊन गेले. तेथे त्यांचे आपसात वाद झाल्याने यातील आरोपींनी मयताचे हातपाय धरून धारदार चाकुने मयताचे गळ्यावर व अंगावर वार करून जिवे ठार मारले. मयताचे प्रेत कोणास दिसु नये म्हणुन वैतरणा धरणाच्या बॅक वॉटर परिसरात घेऊन जाऊन सफेद रंगाच्या प्लॅस्टिकच्या गोण्या व पेट्रोल मृतदेहावर टाकुन पेटवुन दिले असल्याबाबत आरोपींनी कबुली दिली आहे.
ह्या गुन्ह्यातील आरोपी नामे १ ) रामेश्वर उर्फ राम मोतीराम गर्दे, २) सलमान उर्फ माम्या वजीर खान, ३) सदाशिव उर्फ शिव पाराजी गायकवाड यांना ह्या गुन्हयात अटक करण्यात आली असुन न्यायालयाने त्यांना ९ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ह्या गुन्ह्यात आरोपींनी वापरलेली स्कोडा सुपर्ब कार क्र. एमएच ०६ एव्ही ३३४४ जप्त करण्यात आली आहे. ह्या गुन्ह्यात आणखी एक आरोपी फरार असुन पोलीस त्याचा कसोशीने शोध घेत आहेत. यातील आरोपी हे नाशिक शहरातील सराईत गुन्हेगार असुन त्यांच्यावर खुन, खुनाचा प्रयत्न, जबरी दुखापत, जबरी चोरी, घरफोडी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे घोटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर हे ह्या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत. ह्या खुनाचा गुन्हा उघडकीस आणणेसाठी पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घोटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर, पोलीस हवालदार शितल गायकवाड, पोना संतोष दोंदे, पोकॉ योगेश यंदे यांच्या पथकाने ह्या गुन्ह्यातील मयताची ओळख पटवुन खुनाचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे.