प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. ३
इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हेचे जेष्ठ पत्रकार तथा पोलीस मित्र अशोक शिंदे यांची प्राणज्योत उपचारादरम्यान मालवली. वाडीवऱ्हे गावी त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच ग्रामस्थ शोकाकुल झाले. आज गुरुवारी आठवडे बाजार असतांनाही व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने बाजारपेठ बंद ठेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. अशोक शिंदे यांचा काल २ फेब्रुवारीला वाढदिवस होता. समाजमाध्यमातून त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर दिवसभर झळकत होते. मात्र रात्री अचानक त्यांच्या निधनाचे वृत्त प्रसारित झाले. त्यामुळे लगेचच श्रध्दांजलीचे संदेश पसरल्याने दुःखद चित्र निर्माण झाले होते.
१०-१२ दिवसांपूर्वी अशोक शिंदे यांना मोटारसायकल अपघातात डोक्याला मार लागला होता. त्यांच्यावर नाशिकच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असतांना काल रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. विशेष म्हणजे कालच त्यांचा वाढदिवस होता. काल दिवसभर त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचे बॅनर झळकत असतांनाच रात्री त्यांना भावपूर्ण श्रद्धांजलीचे संदेश व्हायरल झाले. यावर कुणाचाही लवकर विश्वास बसत नसल्याने अनेकांनी त्यांची विचारपुस करण्यासाठी संपर्क सुरू केले. आज सकाळी ११ वाजता अशोक शिंदे यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.