इगतपुरीनामा न्यूज, दि. ५
इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव जवळ नाशिककडून मुंबईच्या दिशेने जाणारा भरधाव कंटेनर पलटी झाल्याने मोठा अपघात झाला. पलटी घेताना कंटेनर मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या कारवर जाऊन धडकला. या अपघातात कारमधील जिल्हा परिषद शाळांचे ५ शिक्षक आणि शिक्षिका असल्याचे समजते. सायंकाळी साडेपाच वाजता झालेल्या ह्या अपघातात २ शिक्षक, १ शिक्षिका जागीच ठार तर २ शिक्षक शिक्षिका गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. गंभीर जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. अपघाताची माहिती समजताच जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन 2 गंभीर जखमींना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. घोटी टोलनाका रुग्णवाहिकेने १ गंभीर जखमीला रुग्णालयात दाखल केले. दरम्यान ह्या अपघातामुळे मुंढेगावजवळ मुंबईकडून येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथे महामार्गावर नाशिककडून येणारा भरधाव कंटेनर पलटी झाल्याने अपघात झाला. पलटी घेत घेत हा कंटेनर क्रमांक MP 09 HH 5920 ह्याने MH 15 CM 7532 ह्या वाहनावर गेला. त्यामुळे ह्यामधील धनंजय कापडणीस ( शिक्षक समनेरे ), किशोर राजाराम पवार ( शिक्षक धोंगडवाडी ), ज्योत्स्ना टिल्लू ( शिक्षिका मालुंजे ) हे जागीच ठार झाले तर गीतांजली सोनवणे- कापडणीस, ( शिक्षिका मालुंजे ), शेवंता जगताप-रकीबे ( शिक्षिका मालुंजेवाडी ) हे गंभीर जखमी झाले. हे सर्वजण इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव परिसरातील समनेरे भागातील शिक्षक असल्याचे समजते.