इगतपुरी रेल्वे स्थानकावर लहान मुलगी बेवारस अवस्थेत आढळली

इगतपुरीनामा न्यूज दि. २१ : इगतपुरी रेल्वे स्थानकावर एक अनोळखी लहान मुलगी आढळून आली असून रेल्वे पोलीस सदर मुलीच्या पालकांचा शोध घेत आहेत. अंदाजे पाच वर्ष वयाची ही मुलगी रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर रेल्वे कर्मचाऱ्यांना आढळून आली. तिची विचारपूस केली असता सदर तिने आई पुढे निघून गेली आहे एवढीच माहिती दिली. लोहमार्ग पोलिसांनी या मुलीच्या आईचा शोध घेतला असता ती इगतपुरी रेल्वे स्थानक परिसरात कुठेही आढळून आली नाही, त्यानंतर नाशिक रोड आणि मनमाड स्थानकांवर सदर घटना कळविण्यात येवून मुलगी आढळून आल्याची उद्घोषणा करण्यात आली. मात्र अद्याप या मुलीच्या आईवडिलांनी किंवा नातेवाईकांनी कुणीही संपर्क साधला नसून या मुलीला नाशिक येथे बालकल्याण समितीकडे सुपूर्द करण्यात आले आहे. सदर मुलीच्या पालकांनी किंवा ज्यांना या मुलीबद्दल काही माहिती आहे त्यांनी तातडीने संपर्क साधावा असे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!