इगतपुरीनामा न्यूज दि. २८ : दिवाळी सणासाठी शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि शिक्षण निरीक्षक (उत्तर पश्चिम, दक्षिण) कार्यालयाने १ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर पर्यंत सुट्टी कालावधी जाहिर केला होता. त्यानुसार शाळांमध्ये परीक्षांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना सुट्टी कालावधीची सूचना देण्यात आली आहे. ३० ऑक्टोंबर पर्यंत सत्र परीक्षा घेण्यात येणार आहेत.
मात्र काल अचानक या नियोजनात बदल करण्यात आला असून ऐनवेळी आजपासून दिवाळी सुटी जाहीर करण्यात आली आहे. श्री. राजेंद्र पवार, सह सचिव, महाराष्ट्र शासन यांच्या सहीने काढण्यात आलेल्या शासन परिपत्रकानुसार ऐनवेळी दिवाळी सणाच्या सुट्टी कालावधीत दि. २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर असा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे परीक्षांचे वेळापत्रक कोलमडणार आहे. विद्यार्थी, पालक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मूळगावी जाण्यासाठी केलेले नियोजनही बिघडणार आहे. त्यामुळे सुट्टीमध्ये बदल न करता पूर्वीच्या नियोजनाप्रमाणे एक ते वीस नोव्हेंबर हाच सुट्टीचा कालावधी कायम ठेवण्यात यावा, तसेच या दरम्यान आयोजित करण्यात आलेली राष्ट्रीय संपादणूक चाचणी परीक्षा सुध्दा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात पाटील यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना एक पत्र लिहिले असून शिक्षणमंत्री काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.