ह्यालाच म्हणतात काम…!
देविदास जाधव यांच्या फार्मर्स प्रोड्युसर कंपनीची यशोगाथा

झ्गतपुरीनामा न्यूज, दि. १९

लेखन : वाल्मिक गवांदे, पत्रकार
शेतकरी आजपर्यंत त्यांचा शेतमाल शहरातल्या मार्केटयार्ड येथे घेऊन जात व तिथं आडतदार मध्यस्थी करायचे आणि तो माल घाऊक/किरकोळ व्यापाऱ्यांना विकायचे. अलीकडच्या काळात व्यापारी बांधावर येऊन शेतमाल विकत घेऊन शहरातल्या ग्राहकांना विकू लागले आहेत. पण लॉकडाऊन नंतर हे सगळंच बंद झालं. मग सुरू झाली शेतमालाची थेट विक्री. त्यानंतर पहिले काही दिवस शेतकऱ्यांचा गोंधळ उडाला. कारण, शेतमाल विकण्याची जुनी साखळी विस्कळीत झाली होती. त्यामुळे भाज्या आणि फळं शेताच्या बांधावर सडू लागले होते.
त्यामुळे काही शेतकऱ्यांचं आवसान गळालं होतं. तर काहींनी सावरत वेगळे मार्ग काढले. त्यांनी स्वत: शहरात आणि शेजारच्या गावात जाऊन सरळ ग्राहकांना शेतमाल विकायचं ठरवलं. शेतकरी यासाठी मोबाईल फोन आणि इंटनेटचा वापर करतायेत. लॉकडाऊन संपल्यावरही शेतकरी ते ग्राहक हे ‘थेट विक्रीचं मॉडेल’ यशस्वी होईल, असा तरूण शेतकऱ्यांना विश्वास वाटतोय हे सर्व झाल्यानंतर बाजारपेठा सुरळीत झाल्या. मात्र शेतकऱ्यांना भाव काही मिळेना त्याच पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुका फार्मर्स प्रोड्युसर कंपनीकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनापासून थेट शेतमाल खरेदी करण्याचे नवीन साधन सुरू झाले.
शेतकरी म्हटला की शेतीत कष्ट, मात्र वाढता उत्पादन खर्च, वाहतूक खर्च, मजुरी तसेच अन्य खर्च तसेच निसर्गाचा लहरीपणा यामुळे सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्याला शेती करणे हे परवडण्या सारखे राहीले नाही. त्यामुळे उत्पादन खर्च कमी व उत्पनाची हमी या समीकरणाकडे शेतकऱ्यांचा कल असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा तसेच कमी खर्चात जास्त उत्पादन याबरोबरच उत्पादित शेतमालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी  इगतपुरी तालुका फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून पुढे आली असून तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनापासून ते उत्पादित कृषीमाल खरेदीपर्यंत कंपनीने शेतकऱ्यांशी बांधिलकी जोपासली आहे. इगतपुरी तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात या कंपनीकडे आकर्षित झाला असून तालुक्यातील शेतकऱ्यांनाही दिलासादायक बाब आहे.
शेतकऱ्यांच्या हितासाठी, शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी व शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी इगतपुरी तालुका फार्मर्स प्रोड्युसर कंपनीने कमी कालावधीत चांगले उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन शेतकरी हिताची वाटचाल सुरु केली आहे. या कंपनीने पुणे येथील नेक्सटॉन या कंपनीच्या मदतीने शेतकऱ्यांना कृषितज्ञांकडून मार्गदर्शन, उत्पादित मालाला बाजार भावापेक्षा अधिक दर, जागेवर कृषीमाल खरेदी, यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात चांगले उत्पन्न देण्याचा प्रयत्न आहे अशी माहिती कंपनीचे चेअरमन देविदास जाधव यांनी दिली.
दुग्धउत्पादनाच्या बाबतीत या संस्थेकडून पशुखाद्य, तज्ज्ञांचा सल्ला देते तसेच चांगल्या दराने दुधाची खरेदीही करते. तसेच टोमॅटो उत्पदीत शेतकऱ्यांसाठी तर या कंपनीने अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. रेग्युलर टोमॅटोच्या बाबतीत बाजार भावापेक्षा कँरेट मागे तीस रुपये जास्त दर तसेच जागेवर खरेदी असल्याने वाहतुकीचा प्रती कँरेट २० रु खर्चात बचत होत असल्याने प्रति कँरेट मागे एकूण ५० रु बचत होत आहे. तसेच दर्जेदार जम्बो टोमॅटोच्या बाबतीतही कँरेटमागे १०० रु जादा शेतकऱ्याच्या लाभात पडत आहे.
  मका पिकाच्या बाबतीतही या कंपनीने बेबीकॉर्नसाठी शेतकऱ्यांना लागवडीसाठी बियाणे, कृषितज्ञांचे मार्गदर्शन, खतांच्या योग्य मात्रांचे नियोजन, उत्पादित मका कणसांचे साडेसहा रुपये प्रति किलोने जागेवर खरेदी करते. त्यामुळे शेतकऱ्यांचा वाहतुकीचाही खर्च बचत होतो. तसेच बेबीकॉर्नचा राहिलेला चाराही उपयोगात आणून त्यापासून मुरघास बनविण्याचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना दिले जात आहे. तसेच मुरघाससाठी बॅगाही शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाते. विशेष व उल्लेखनीय बाब म्हणजे बेबीकॉर्नपासून साधारण एका एकरात दोन महिन्यात ५० हजार रुपये शेतकऱ्यांना निव्वळ नफा मिळतो.
गेल्याच महिन्यात तालुका फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या पुढाकारातून तालुका पशुसवर्धन व कृषी विभागाच्या सहकार्याने तालुक्यातील २० शेतकऱ्यांना कडबा कूट यंत्राचे शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर वाटप करून शेतकऱ्यांचे हित साधले. आगामी काळातही दूध, फळभाज्या आदी शेतमालाच्या बाबतीत पुणे येथील या कंपनीशी करार करून तालुक्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक हीत जोपासले जाणार आहे. कृषी माल उत्पादनाच्या बाबतीत या माध्यमातून कृषीतज्ञ, प्रगतिशील व प्रयोगशील शेतकरी यांचे मार्गदर्शन, सल्ला उपलब्ध करून दिला जातो.
इगतपुरी तालुक्यातील या कंपनीला नाबार्डचे, बायफ संस्थेचे आर्थिक  सहाय्य तसेच शासनाच्या विविध कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग यांचे  मार्गदर्शन, सहकार्य मिळत आहे.  शेतकऱ्यांसाठी उत्पन्न व उत्पादन वाढीसाठी हा चांगला पर्याय असून तालुक्यातील शेतकऱ्यांनी या संस्थेचे सभासदत्व स्वीकारून संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन संस्थेचे चेअरमन देविदास जाधव यांच्यासह संचालक रमेश गोवर्धने, गोरख तांबे, निवृत्ती गायकर, पांडुरंग शिंदे, वसंत जाधव आदी संचालक मंडळाने केले आहे.

देविदास जाधव

Similar Posts

Comments

  1. avatar
    मदन निवृत्ती खातळे says:

    काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचा…….. प्रगतीचा कणा असलेली इगतपुरी फार्मर्स प्रोडूसर कंपनी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही

Leave a Reply

error: Content is protected !!