घोटीत शटर तोडून ४ दुकानात चोऱ्यांचा प्रयत्न ; पोलिसांच्या सतर्कतेने एक संशयित ताब्यात

इगतपुरीनामा न्यूज, दि. १९
इगतपुरी तालुक्यातील मध्यवर्ती वाजारपेठ असणाऱ्या घोटी शहरात गुरुवारी मध्यरात्री २ ते २.३० वाजेच्या सुमारास ४ दुकानात चोरी झाल्याचे वृत्त आहे. घोटी पोलिसांचे गस्ती वाहन रात्री फिरत असतांना पोलिसांना संशयास्पद हालचाली दिसल्याने मोठ्या चोरीचा चोरट्यांचा डाव उधळला गेला. पोलिसांच्या कारवाईत एक संशयित हाती लागला आहे.
घोटी येथील विजयराज मार्केट मधील परी कलेक्शन, राजे जेन्ट्स शॉपी, ब्रँड शूज आणि फॅशन हब या दुकानांमध्ये शटर तोडून चोरट्यांनी प्रवेश केला. त्यांनी नेमका काय मुद्देमाल चोरला याबाबत अद्याप माहिती समजली नाही. गुरुवारी रात्रीच्या सुमारास घोटी पोलिसांचे गस्ती वाहन ह्या भागातून फिरत असतांना ह्या दुकानांमध्ये संशयास्पद हालचाली दिसल्याने पोलिसांनी सतर्कतेने चक्रे हलवली. यामध्ये एक संशयित युवक ताब्यात घेण्यात आला आहे. संशयिताचे इतर साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाल्याची चर्चा आहे. पोलिसांकडून चौकशी सुरू असून आज दुपारपर्यंत सर्व काही स्पष्ट होणार असल्याचे समजते. दुकानातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येणार असून ह्यातून चोरट्यांचा छडा लागू शकेल. घोटी पोलिसांकडून कसून तपास सुरू करण्यात आला आहे.