घोटीत चार दुकानांचे शटर तोडून  चोरीचा प्रयत्न ; एका संशयितास पोलिसांकडून जेरबंद तर दोघे फरार

इगतपुरीनामा न्यूज, दि. १९
इगतपुरी तालुक्यातील मध्यवर्ती बाजारपेठ असणाऱ्या घोटी शहरात गुरुवारी मध्यरात्री २ ते २.३० वाजेच्या सुमारास एकाच ठिकाणी असलेल्या ४ दुकानात अज्ञात चोरट्यांनी दुकानांचे शटर वाकवून धाडसी चोरीचा प्रयत्न केला. मात्र तीन दुकानात चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही तर एका दुकानातून चार हजार रुपये चोरट्यांचा हाती लागले. या चोरी सत्राने परिसरात खळबळ उडाली असून व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घोटी पोलिस कर्मचारी बस्ते व केदारे हे मोटारसायकल गस्त फिरत असतांना पोलिसांना घोटीतील विजयराज मार्केटजवळ संशयास्पद हालचाली दिसल्याने धाव घेतली. या धक्कादायक प्रकाराने मोठ्या चोरीचा डाव उधळला गेला. पोलिसांच्या कारवाईत एक संशयित हाती लागला तर अन्य दोन साथीदार पळून गेले.
घोटी येथील विजयराज मार्केट मधील परी कलेक्शन, राजे जेन्ट्स शॉपी, ब्रँड हाऊस आणि फॅशन हब मोरया या दुकानांमध्ये शटर तोडून चोरट्यांनी प्रवेश केला. गुरुवारी रात्रीच्या सुमारास घोटी पोलिसांचे गस्ती वाहन ह्या भागातून फिरत असतांना ह्या दुकानांमध्ये संशयास्पद हालचाली दिसल्याने पोलिसांनी सतर्कतेने चक्रे हलवली. यामध्ये एक संशयित युवक ऋषिकेश अशोक राजगीरे रा. चिंचोळे, अंबड नाशिक याला ताब्यात घेण्यात आले आहे. संशयिताचे इतर दोन साथीदार युवराज व नाना ( पूर्ण नाव माहित नाही ) रा. घोटी हे पळून जाण्यात यशस्वी झाल्याची चर्चा आहे.
घोटी पोलिसांनी या चोरीबाबत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहायक निरीक्षक जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पारधी,शीतल गायकवाड, केदारे, बस्ते आदी करीत आहे.