“आई जेवू घालीना अन बाप भीक मागू देईना” : त्र्यंबक तालुक्यातील अर्थमूव्हर्स तरुणांची अवस्था बिकट

वड्याचे तेल वांग्यावर काढू नका : बेरोजगारांची अधिकाऱ्यांना विनवणी

ज्ञानेश्वर मेढेपाटील, इगतपुरीनामा न्यूज, दि. १७

ब्रम्हगिरी उत्खनन प्रकरणी काही लोकांच्या गैरप्रकारांमुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अर्थमूव्हर्स क्षेत्रातील होतकरू तरुणांना चांगलाच फटका बसला आहे. कामे असूनही शासनाच्या निर्बंध आदेशामुळे घरीच बसावे लागणार असल्याने तरुणांमध्ये असंतोष वाढत आहे. दुष्काळात तेरावा महिना म्हणजे वाहनांना अर्थपुरवठा करणाऱ्या बँकांनी तगादे सुरू केल्याने व्यावसायिक तरुण मेटाकुटीला आले आहेत. ह्या प्रकरणी जिल्हा प्रशासनाने सहानुभूतीने विचार करावा अशी मागणी इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार दीपक गिरासे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी ह्याबाबत वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले.

जिल्ह्यात ब्रह्मगिरी उत्खनन प्रकरण चांगलेच गाजले असून शासनाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत योग्यच निर्णय घेतले आहेत. तथापि निर्बंध आदेशांचा फटका ह्या क्षेत्रातील अन्य कामांना बसला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमीन सपाटीकरण करण्यासाठी वापरली जाणारी यंत्रसामुग्री आणि मशीनरी मालकांना याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. यामध्ये फोकलॅन्ड, जेसीबी, स्ट्रॅक्टर आदी मशीनरी यांचा समावेश असून सध्या अनेक कामे असूनही शासनाची परवानगी नसल्यामुळे कामे करता येत नाही. यामुळे येथील स्थानिक मशीनरी चालक, मालक बेरोजगार झाले आहेत.

कोरोनामुळे आधीच ह्या क्षेत्राला प्रचंड नुकसान झाले असून कोरोना निर्बंध सैल झाले असूनही कामे बंद आहेत. त्यामुळे “आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना” अशी व्यावसायिकांची अवस्था झाली आहे.
काम बंद असल्यामुळे अनेक मशीनरी मालकांनी मशीन आपल्या दारात उभी करून ठेवली आहे. यामुळे त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असे प्रश्न उभे राहिले आहेत. परिणामी सर्वांवर उपासमारीची वेळ येणार आहे. 25 ते 50 लाखांची कर्ज काढून मशिनरी घेतलेली असल्याने बँकांचे हप्ते सुद्धा थकले आहे. त्यामुळे बँकांकडून कारवाईची सुद्धा भीती वाढली आहे.

ह्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अर्थमूव्हर्स संघटनेच्या अडचणीबाबत योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण, त्र्यंबकेश्वरचे तहसीलदार दीपक गिरासे यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी मशीन मालकांनी आपल्या व्यथा मांडल्या. योग्य ते नियम आखून उपाययोजना करून काम करण्यास परवानगी देण्यात यावी. शासनाच्या नियमावलीचे  पालन करण्यास व्यावसायिक तयार असल्याने परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. तहसीलदार दीपक गिरासे यांनी याबाबत वरिष्ठाशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल असे सांगितले.

याप्रसंगी त्र्यंबकराज अर्थमूव्हर्स संघटनेचे अध्यक्ष समाधान सकाळे, उपाध्यक्ष सनी मेढेपाटील, सदस्य संपत बोडके, नवनाथ कोठुळे, पप्पू कडलग, सुरेश नायकर, योगेश्वर शिरसाठ, पिंटू पोरजे, अंकुश बोडके, सुनील मेढेपाटील, भावडू बोडके, भाऊसाहेब महाले, नितीन सकाळे, दत्ताभाऊ बोडके, भाऊसाहेब बोडके, रोशन बोडके, तानाजी बोडके, विजय व्होन, संतोष महाले, सचिन चव्हाण, गणेश महाले, बाळासाहेब शिरसाठ, धोंडीराम मोरे, संदीप बोडके, विजय बोडके, नाना कसबे, पांडुरंग वाकसरे, तानाजी चोथे, प्रभाकर मुळाणे, चेतन तिदमे, मधू मुळाणे, प्रवीण मेढेपाटील माणिक बोडके,भगवान बोडके आदी मशीन मालक उपस्थित होते.