लेखन – पुरुषोत्तम आवारे पाटील
दै. अजिंक्य भारत अकोला
संवाद – 9892162248
सभ्य माणसांचा काळ सांगा कोणता ? असा प्रश्न एका गझलेत इलाही जमादार यांनी विचारला होता. निवडणुका जवळ आल्या की राजकारण आणि पुढार्यांना शिव्या देणे ऐकायला आले की समजून जावे हाच सभ्य माणसांचा काळ आहे. महानगर असो की नगर त्यातल्या राजकारणापासून अंतर राखून, नेते म्हणजे बदमाश अन् राजकारण घाणेरडे असे ज्यांना वाटते त्या वर्गाने राजकारण घाण करण्यात खरंतर मोठी भूमिका बजावलेली असते.
नोकरदारांना राजकारण करता येत नाही परंतु समाजातला असा 50 टक्के नोकरदार वर्ग बाजूला काढला तर उरलेल्या 50 टक्के वर्गाने आपला उद्योग, धंदा सांभाळून थेट राजकारण करायला काय हरकत आहे ? सज्जन, प्रामाणिक आणि नेहमी सरळ मार्गाने जाणारा मोठा समूह सगळ्याच जाती धर्मात कार्यरत आहे. तो सतत विविध कारणांनी राजकारण आणि नेत्यांना शिव्या देण्यात धन्यता मानतो. राजकारण हे बदमाशांचे क्षेत्र आहे, तिथे गुन्हेगारांना सन्मान मिळतो, ते आपल्यासारख्या साध्या, सरळ माणसांचे काम नव्हे असा समज जवळपास सर्व स्तरातल्या सामान्य माणसांनी करवून घेतला आहे.
ज्या व्यक्ती राजकारण, नेते किंवा पक्षाला सतत शिव्या देत असतात त्या व्यक्तींना वारंवार अशा अप्रिय व्यवस्थेशी काम पडत असते. कधी नगरपालिका, महानगरपालिका, बँक, कृउबा किंवा सोसायटी नव्हे हाउसिंग सोसायटींच्या निवडून आलेल्या पदाधिकार्यांशी सतत काहीतरी काम पडत असते. अशावेळी मात्र राजकारणातील या वाईट लोकांनी आपली कामे पटापट करून द्यावीत अशी अपेक्षा हा वर्ग ठेवत असतो. चांगल्या आणि सज्जन लोकांनी राजकारणापासून स्वत:ला दूर ठेवल्याचे दुष्परिणाम आज आपण सगळेच भोगत आहोत. चार वर्ष, अकरा महिने नेत्यांना शिव्या देणारा हा कथित सज्जन व्यक्ती निर्णायक क्षणाला डोळ्यात तेल घालून सजग रहात नसतो. परिणामी पुन्हा गुंड, बदमाश आणि खोर्याने पैसा ओढण्याची मनीषा बाळगणारे लोक निवडणुकात सज्जनांच्या नाकावर टिच्चून विजयी होतात.
चिखलात उगवलेले कमळ प्रत्येकाला आवडते. मात्र ते आपल्याला हवे असेल तर चिखलात उतरण्याची, कपडे चिखलाने माखून घेण्याची तयारी असावी लागते. शहर, महानगर किंवा कोणत्याही राजकारणात नवे बदल घडवून आणायचे असतील तर व्यवस्थांना शिव्या देऊन चालणार नाही. त्या व्यवस्थेत शिरून, राजकारणात उडी घेऊन आपल्याला बदल घडवावा लागेल. आणखी किती काळ काठावर राहून राजकारण किंवा पुढार्यांना आपण शिव्या देणार आहोत ? कुणी अपघाताने राजकारणात पडला तर तो यशस्वी होण्याची शक्यता कमी असते. त्यासाठी राजकारणात पडू नका, जाणीवपूर्वक उडी घ्या असे यशवंतराव चव्हाण नेहमी सांगत असत. लोक म्हणतात आम्हाला, उद्योग, धंदे आणि आमचे करिअर आहे म्हणून इकडे लक्ष द्यायला वेळ नाही, मग राजकारण काय आहे ? हा सुद्धा अलीकडे पूर्णवेळ व्यवसाय बनला आहे. कल्पक तरुणांचे हे क्षेत्र करिअर बनले आहे.
गल्ली ते दिल्लीच्या राजकारणात जोवर शिक्षित, अभ्यासू आणि प्रामाणिक व्यक्तींचे प्रमाण वाढणार नाही तोवर राजकारणाच्या शुद्धीकरणाला सुरुवात होणार नाही. त्यासाठी राजकारणात वकील, डॉक्टर, इंजिनिअर, सीए, उद्योजक, कलावंत, निवृत्त अधिकारी, आर्थिक सक्षम तरुणांनी सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. ज्यांच्याकडे विकासाची दूरदृष्टी आणि काहीतरी नवे करून दाखविण्याची जिद्द असेल अशी माणसं जोवर एकत्र येऊन राजकारण हाती घेत नाहीत तोवर आपल्याला चांगले दिवस येणार नाही. लक्षात घ्या आपल्या परिवाराला उत्तम नागरी सुविधा मिळून प्रत्येकाचे जगणे सुसह्य करण्यासाठी कुणी परग्रहावरून येणार नाही. आपल्यातूनच कुणाला तरी त्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. उत्तम नियोजन करून कुणाला तरी या चिखलात उतरून, सज्जनशक्तीचा सहभाग वाढवत चिखल साफ करावा लागेल.
आम आदमी पक्षाला कुणी काही म्हणत असले तरी गेल्या काही वर्षात या पक्षाच्या माणसांनी नव्या राजकीय बदलाची प्रक्रिया सुरू केली आहे. समाजातील शिक्षित वर्ग जाती, धर्माच्या भिंती ओलांडून राजकारण बदलण्यासाठी पुढे येत आहेत, मात्र वर्हाडात तसे काही होताना दिसत नाही. परंपरागत राजकारण आणि सडलेल्या व्यवस्थेच्या दलदलीत आपण पुरते फसलो असूनही त्याची सवय झाली आहे. राजकारणाचे मोठे क्षेत्र जाणीवपूर्वक आम्ही अप्रामाणिक माणसांच्या हवाली करून टाकले आहे. त्यात जी मूठभर सज्जन माणसं राहिली असतील त्यांना सोबत घेऊन प्रामाणिक माणसांनी शहराच्या राजकारणात सक्रिय व्हायला हवे.