नाभिक बांधवांना आर्थिक मदतीसाठी आरोग्यमंत्र्यांची भेट घेणार ; सलून व्यावसायिकांसाठी लवकरच लसीकरण शिबीर ; आमदार खोसकर यांचे सलून असोसिएशनला आश्वासन

इगतपुरीनामा न्यूज, दि. १०
कोरोना महामारीमुळे नाभिक समाज बांधवांचा व्यवसाय ठप्प असल्याने त्यांच्या उपासमारीला सुरुवात झाली आहे. म्हणून नाभिक समाज बांधवांना महाराष्ट्र शासनाने तातडीने अर्थसहाय्य करावे. अनेकांच्या सातत्याने संपर्कात असणाऱ्या सलून व्यावसायिकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरणामध्ये प्राधान्य द्यावे. सलून व्यावसायिकांसाठी स्वतंत्र लसीकरण शिबीर घ्यावे या मागण्यांसाठी आज इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर यांना निवेदन देण्यात आले. नाशिक जिल्हा सलून असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी  आमदार हिरामण खोसकर यांना भेटून कैफियत मांडली. असोसिएशनतर्फे विविध मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले. समाजाच्या मागण्या शासनापर्यंत नक्की पोहचवून योग्य तो निर्णय घेण्यात येईल. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन अर्थसहाय्य व न्याय्य मागण्या पूर्ण करण्यासाठी बांधील असल्याचे सांगत श्री. खोसकर यांनी सांगितले. लवकरच नाभिकांसाठी लसीकरण शिबिर त्र्यंबकेश्वर आणि घोटी येथे घेऊ असेही त्यांनी आश्वासन दिले.
सलून असोसिएशनचे नाशिक जिल्हाध्यक्ष एकनाथ शिंदे, ॲड. सुनिल कोरडे, जिल्हा उपाध्यक्ष निवृत्ती आंबेकर, इगतपुरी तालुकाध्यक्ष मच्छिन्द्र कोरडे, वैभव कोरडे, घोटी ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ कडवे आदींनी आमदार हिरामण खोसकर यांच्याशी सविस्तर चर्चा केली. नाभिक समाज आधीच आर्थिक मागासलेला असतांना कोरोना महामारीमुळे व्यवसाय ठप्प आहे. परिणामी समाजाने जगायचे कसे ? असा सवाल उपस्थित झाला आहे. नाभिक बांधवांसाठी शासनाने अर्थसहाय्य करणे आवश्यक आहे. यासह सलून व्यावसायिक व कारागीर हा फ्रंट लाईन वर्कर असुन त्याचा अनेकांशी संबंध येतो. त्यामुळे नाभिक कुटुंबांना संसर्ग होऊ शकतो. त्यादृष्टीने नाभिक बांधवाना प्राधान्याने कोरोना प्रतिबंधक लस द्यावी. स्वतंत्र लसीकरणासाठी स्वतंत्रपणे शिबिराचे आयोजन करावे. आदी मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले. आमदार खोसकर यांनी मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!