धरण भागातील अतिक्रमण धारकांनो सावधान..! : भावली, मुकणे, दारणा, वाकी खापरी आदी धरण परिसरातील अतिक्रमण काढणार 

इगतपुरीनामा न्यूज – राज्याचे जलसंपदा मंत्री ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील (गोदावरी व कृष्णा खोरे) यांच्या धरण व कालव्यांवरील अतिक्रमण काढण्याबाबतच्या सूचनेनुसार नाशिक पाटबंधारे विभागाने जलसंपदा विभागाच्या जागेतील अतिक्रमण काढण्यासाठी पथक तयार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार कश्यपी धरणापासून कार्यवाहीला सुरवात करण्यात आली. आता इगतपुरी तालुक्यात भावली, मुकणे, दारणा, वाकी खापरी आणि नाशिक तालुक्यातील गंगापूर आदी धरण परिसरातील अतिक्रमण काढण्याची कार्यवाही लवकरच टप्प्याटप्प्याने सुरु केली जाणार आहे. अतिक्रमण करणाऱ्यांनी शक्य तेवढ्या लवकर स्वतःहून अतिक्रमण काढून पाटबंधारे विभागाला सहकार्य करावे असे आवाहन नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी केले आहे. अतिक्रमण न काढल्यास होणाऱ्या संभाव्य नुकसानीला जलसंपदा विभाग जबाबदार राहणार नाही असेही त्यांनी कळवले आहे. दरम्यान आज कश्यपी धरणावरील कैलास बेंडकुळे यांचे कश्यपी हॉटेल शासकीय जलसंपदाच्या दीड एकर जागेतील सर्व अतिक्रमण काढण्यात आले. कश्यपी धरणाच्या बुडीत क्षेत्राला लागून गिरणारे हरसुल रोडला लागून असलेले हॉटेल क्रूज यांचेही अतिक्रमण काढण्यात आले, हॉटेल कश्यपी पिकनिक पॉईंटचे अतिक्रमण सुद्धा आज काढण्यात आले. धोंडेगाव शिवारातील शासकीय जलसंपदा विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण केलेल्या सर्व हॉटेलचे अतिक्रमण जलसंपदा विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत काढण्यात आले आहे. 

error: Content is protected !!