घोटीतील हॉस्पिटलला जीवे मारण्याच्या धमक्या आणि झुंडशाहीने मागितली २० लाखांची खंडणी : घोटी डॉक्टर्स असोसिएशनचे पोलिसांना निवेदन ; सोमवारी लाक्षणिक संप

इगतपुरीनामा न्यूज – घोटी येथील डॉक्टरला जीवे मारण्याच्या धमक्या आणि २० लाख रुपयांची खंडणी मागण्यासाठी जमाव जमा करणाऱ्या दहश्तखोरांवर कायदेशीर मार्गाने आळा घालावा. या मागणीसाठी घोटी डॉक्टर्स असोसिएशनने घोटी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांना निवेदन दिले. दहशतखोरांच्या निषेधार्थ सोमवारी लाक्षणिक संप पुकारण्यात येणार आहे. पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी या प्रकरणी योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्याचे पदाधिकाऱ्यांना सांगितले. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. जयंत कोरडे, उपाध्यक्ष डॉ. जितेंद्र चोरडिया, महेंद्र शिरसाठ, डॉ. धनंजय चव्हाण आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, असोसिएशन मधील सभासद डॉ. मकरंद सुधाकर काळे यांच्या जय हरी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये मागील आठवड्यात एक रुग्ण मयत झाला. त्यांच्या नातेवाईकांनी अन्य २०० ते ३०० लोकांच्या जमावाने हत्यारासह या हॉस्पिटलवर हल्ला चढवला. येथील डॉक्टरांना आणि हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांना जिवे मारण्याच्या धमक्या देण्याच्या उद्देशाने धारदार हत्यारासह चाल केली. त्यांच्यावर हल्ला न करण्याच्या बदल्यात त्यांनी २० लाख रुपयांची खंडणी ३० मे पर्यंत द्यावी अशी धमकी दिली. खंडणीची रक्कम न दिल्यास डॉक्टरांना मारून टाकू, सदरचे हॉस्पिटल जाळून टाकू अशी धमकी दिली. त्यामुळे डॉक्टर व हॉस्पिटलमधील सर्वजण अत्यंत दहशतीच्या वातावरणात जगत आहे. असे झुंडशाहीचे प्रकार घडल्यास घोटीमधील सर्व हॉस्पिटलला रूग्णसेवा बंद करावी लागेल. याचा परिणाम इतर रूग्णांवर होईल. भविष्यात असे प्रकारचे प्रकार अन्य हॉस्पिटलसोबत देखील घडण्याची दाट शक्यता असल्याने ह्या प्रकरणात गांभीर्याने लक्ष द्यावे. संबंधित व्यक्तींच्या विरूध्द योग्य ती कायदेशीर कारवाई करून डॉ. मकरंद काळे व त्यांच्या कुटुंबियांना संरक्षण देवून ह्या प्रकरणातील खंडणी मागून दहशत पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करावा.

error: Content is protected !!