स्थानिक विरुद्ध बाहेरचे उमेदवार – ‘असा’ आहे इगतपुरी मतदारसंघाचा इतिहास

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – लोकांना मतदारसंघाच्या बाहेरचा उमेदवार नको असेल तर ते अशा उमेदवाराला मतेच देणार नाहीत. पण बहुसंख्य मतदार असा भेद न करता त्यांना निवडून देतात. इगतपुरी मतदारसंघात सध्या स्थानिक आणि बाहेरचा असा विषय चर्चेचा मुद्दा झाला आहे. ह्या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील महत्वाचा इतिहास समजून घेणे आवश्यक आहे. लोकनेते स्व. गोपाळराव ( दादासाहेब ) गुळवे आणि त्यांचे स्नेही तत्कालीन केंद्रीय मंत्री स्व. माणिकराव ( दादा ) गावित यांची मैत्री सर्वश्रुत होती. इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाच्या विकासासाठी दुरगामी दृष्टीकोन असणाऱ्या ह्या दोन्ही महान व्यक्तींनी २००९ ला विधानसभा निवडणूक काळात घेतलेला एक निर्णय ऐतिहासिक ठरला. इगतपुरी मतदारसंघाच्या इतिहासात प्रथमच निर्मला गावित ह्या बाहेरील उमेदवाराला इंदिरा काँग्रेसची अधिकृत उमेदवारी देण्यात आली. स्थानिक आणि परके असा भेद करून त्यांचा पराभव करण्यासाठी अनेकानेक प्रयत्न झाले. पण अपेक्षेप्रमाणे येथील मतदारांनी स्थानिक परक्याचा वाद झूगारून देत निर्मला गावित यांना मताधिक्क्याने निवडून दिले. आमदारकीच्या पहिल्या टर्ममध्ये इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघात त्यांनी कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली. म्हणूनच २०१४ च्या निवडणुकीत इंदिरा काँग्रेसने त्यांना दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. मतदारांनी त्यांना पुन्हा संधी देत दुसऱ्यांदा आमदारकी बहाल केली. आमदार म्हणून ही दुसरी टर्म त्यांनी गाजवून मतदारसंघात शाश्वत विकासाची कामे केली. २०१९ मध्ये राज्याचे राजकीय वातावरण काँग्रेस पक्षाला प्रतिकूल आणि शिवसेनेला अनुकूल असे वाटल्याने त्यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेचा भगवा हाती घेतला. शिवसेनेने त्यांना अधिकृत उमेदवारी दिली मात्र यावेळी त्यांना पराभव पत्करावा लागला. ह्या दहा पंधरा वर्षाच्या काळात निर्मला गावित ह्या मतदारसंघाच्या स्थानिक रहिवासी बनून गेल्या. मागे वळून पाहिले तर सध्या त्या शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या असून आगामी निवडणुकीतील संभाव्य उमेदवार आहेत.

२०१९ ह्या वर्षी निर्मला गावित यांच्या शिवसेना प्रवेशामुळे इंदिरा काँग्रेस पक्षाला सक्षम उमेदवाराचा शोध घेण्याचे आव्हान होते. नाशिक तालुक्यात वास्तव्य असणारे आणि तत्कालीन काळात राष्ट्रवादीचे निष्ठावान असणारे विद्यमान आमदार हिरामण खोसकर यांनी त्यावेळी राष्ट्रवादी सोडली. त्यांना लगेचच काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवारी देण्यात आली. राजकीय समीकरणे पथ्यावर पडून ते इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार म्हणून निवडून आले. त्यांनाही आगामी निवडणुकीत उमेदवारीची संधी लाभणार आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आडगाव देवळा हे आमचे मूळ गाव असल्याचे हिरामण खोसकर म्हणाले आहेत. २०१९ मध्ये आदिवासी विकास परिषदेच्या माध्यमातून राज्यस्तरावर सर्वोत्तम कामगिरी करणारे लढवय्ये युवा नेते लकीभाऊ जाधव यांना वंचित बहुजन आघाडीने अधिकृत उमेदवारी देऊन निवडणुकीत उतरवले होते. मतदारांनी त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मते देऊन विश्वास दाखवला होता. सकल आदिवासी समाजाच्या विकासासाठी राज्यभर आंदोलने आणि संघटन करणाऱ्या लकीभाऊचे मूळ वास्तव्य इगतपुरीच्या सीमेजवळ असणाऱ्या गावातले आहे. सध्या त्यांचा ह्या मतदारसंघात कमालीचा जनसंपर्क आहे. ह्याचवर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नाशिकचे तत्कालीन नगरसेवक योगेश शेवरे यांना उमेदवारी दिली होती. त्यांचाही ह्या मतदारसंघात मोठा जनसंपर्क आहे. याहीवेळी कदाचित त्यांना उमेदवारी करण्याची संधी मिळू शकते. निवडणुक काळात अनेक ठिकाणी उमेदवार आयात करून सुरक्षितपणे हमखास निवडून आणण्यासाठी उभे केले जाते. भाजपा नेते अरुण जेटली यांना अमृतसर येथून उभे करण्यात आले होते. डॉ. मनमोहन सिंग हे पंतप्रधान असतांना ते लोकसभेवर निवडून आले नसल्याने त्यांना आसामातल्या राज्यसभेच्या जागेवरून निवडून आणावे लागले. पी. व्ही. नरसिंहराव हे मुळ आंध्रातले होते आणि त्यांनी या राज्याचे मुख्यमंत्रीपदही भूषविले होते पण त्यांना लोकसभेवर निवडून आणताना दोनदा महाराष्ट्रातल्या रामटेकमधून उभे करण्यात आले. नंतर ते पंतप्रधान झाले आणि पोटनिवडणुकीत ओरिसातून निवडून आले. इंदिरा गांधी यांना उत्तर प्रदेशातल्या मतदारांनी नाकारले तेव्हा त्या एकदा आंध्रातल्या मेदक येथून निवडून आल्या. त्यांचे हे खासदारपद संसदेचा हक्कभंग केल्याबद्दल रद्द झाले तेव्हा त्या पुन्हा कर्नाटकातल्या चिकमंगळूर मधून निवडून आल्या होत्या. त्यावेळी आतला उमेदवार किंवा बाहेरचा उमेदवार असा भेद कोणी केला नाही. अशा वेळी बाहेरचा किंवा आतला म्हणून कोणी वाद निर्माण करीत नाहीत. लोकांना बाहेरचा उमेदवार नको असेल तर ते अशा उमेदवाराला मतेच देणार नाहीत. पण ते असा भेद न करता त्यांना निवडून देतात. सारा देश आणि राज्य एक आहे असे मानले तर असा भेद करणे अयोग्य ठरते. आगामी काळात इगतपुरी मतदारसंघात या विषयामुळे काय परिणाम होतो याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Similar Posts

error: Content is protected !!