घोटी बाजारात हरवलेल्या ७ वर्षीय बालकाचा घोटी पोलिसांच्या तत्परतेने काही वेळातच लागला शोध

इगतपुरीनामा न्यूज – त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी येथील महिलेसोबत आलेला तिचा ७ वर्षाचा हरवलेला मुलगा आज घोटी पोलिसांच्या तत्परतेने अवघ्या तासाभरात सापडला आहे. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही वेळात या बालकाचा शोध लावला. बालकाला आईवडिलांच्या ताब्यात देण्यात आले असून आईने आनंदाच्या अश्रूधारांचा वर्षाव करीत पोलिसांचे ऋण व्यक्त केले आहेत. घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदेश पवार, पोलीस हवालदार प्रसाद दराडे, सतीश शेलार, योगेश यंदे, शिवाजी शिंदे यांनी ही कामगिरी केली.

शितल सोमनाथ शिद वय २९ रा. अंजनेरी ता. त्र्यंबकेश्वर ही महिला तिचे पती आणि लहान मुलांना घेऊन घोटी येथे बाजार करण्यासाठी आली होती. आज दुपारी २ वाजता तिचा ७ वर्षाचा मुलगा ओमकार सोमनाथ शिद बाजारातून अचानक हरवला. ही बाब ध्यानात आल्यावर सर्वांनी बालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र बालकाचा शोध लागला नाही. अखेर तिने घोटी पोलीस ठाणे गाठून रडतरडत बालकाचा शोध लावण्याची विनंती केली. तातडीने पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदेश पवार, पोलीस हवालदार प्रसाद दराडे, सतीश शेलार, योगेश यंदे, शिवाजी शिंदे यांनी कार्यवाही सुरु केली. अवघ्या काही वेळात ओमकार सोमनाथ शिद महामार्ग भागातील भगतसिंग नगर येथून ह्या बालकाला शोधून काढण्यात आले. मुलाच्या आई वडिलांनी पोलिसांचे पाय धरून आभार व्यक्त केले. बालकाला आईवडिलांच्या ताब्यात देण्यात आले असून पोलिसांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Similar Posts

error: Content is protected !!