इगतपुरीनामा न्यूज, दि. 23
कोरोना महामारीच्या निर्मूलनासाठी बहुगुणी असणाऱ्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला इगतपुरी तालुक्यातील आडवण ह्या दुर्गम भागात अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. काननवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आडवण उपकेंद्र आणि ग्रामपंचायत आडवण यांनी ही सर्वोत्तम दिमाखदार कामगिरी केली आहे. सरपंच सुगंधा हंबीर, ग्रामसेवक एन. एस. खांडेकर आदींनी लसीकरण कार्यक्रमाचा शुभारंभ केला. गावातील वयोवृद्ध नागरिकांचा सहभाग लक्षणीय ठरला. यावेळी रॅपिड अँटीजेन चाचण्या करून आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोना आजाराबाबत गावकऱ्यांना मार्गदर्शन आणि जनजागृती सुद्धा केली. आडवण ग्रामस्थांनी कोरोना लसीकरण कार्यक्रमाला दिलेला उदंड प्रतिसाद हा इगतपुरी तालुक्यासाठी मैलाचा दगड ठरेल. आडवण गावाचा अन्य गावांनी आदर्श घ्यावा असे कौतुकोद्गार तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी काढले.
कोरोनाच्या संसर्गामुळे सगळीकडे अत्यंत बिकट परिस्थिती असतांना ह्या आजारापासून बचाव करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण अत्यंत बहुगुणी ठरले आहे. याबाबत आडवण गावातील सुज्ञ आणि जाणकार नागरिकांना आडवण उपकेंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी जनजागृती करतांना सांगितले. त्यानुसार ह्या गावातील अनेक नागरिकांनी आमच्या आडवण गावात लवकरात लवकर कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम घ्यावा अशी मागणी केली. ह्या अनुषंगाने काननवाडी आरोग्य केंद्राच्या साहाय्याने आडवण उपकेंद्रात हा कार्यक्रम घेण्यात आला. मुंबईच्या विक्रीकर आयुक्त अर्चना पाटणे-कुलकर्णी यांनी आयोजनासाठी मार्गदर्शन व सहकार्य केले. सकाळी साडेनऊ पासून लसीकरण संपेपर्यंत येथील वयोवृद्ध आणि 45 वयोगटाच्या पुढील पुरुष आणि महिला ग्रामस्थांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. ग्रामस्थांची रॅपिड अँटीजेन चाचण्या सुद्धा करण्यात आल्या. यासह ग्रामस्थांचे आजाराबाबत शंका समाधान, लसीकरण बाबत मार्गदर्शन आणि जनजागृती करण्यात आली.
इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख, नोडल अधिकारी डॉ. विश्वनाथ खतेले, काननवाडी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली गायकवाड-ठाकरे, डॉ. चित्रा वेढे यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण कार्यक्रमाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. डॉ. रवींद्र क्षीरसागर, डॉ. मधूलिका क्षीरसागर यांच्या समन्वयाने आरोग्य विभागाचे कर्मचारी यादव बोराडे, विजय सोपे, एम. वाय. शेख, नूतन शिंदे, जनाबाई घाणे, मानसिंग पावरा, सुनील काळे, सागर गुंड, भास्कर पराडे, परशराम चौधरी, सुरेश इनामके, रेखा जाधव, ज्योत्स्ना शेवाळे, पप्पूबाई शेलार, सगुणा लहाने, अलका गणेशकर आदींनी लसीकरण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. आडवण ग्रामपंचायतीच्या सरपंच सुगंधा हंबीर, ग्रामसेवक एन. एस. खांडेकर, कर्मचारी मंगेश शेलार, भगवान गणेशकर आदींसह ग्रामपंचायत सदस्यांनी ह्या कार्यक्रमासाठी सहयोग दिला.
आडवण गावाचे काम कौतुकास्पद
आडवण गावाने कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमात दिलेला प्रचंड प्रतिसाद अतिशय कौतुकास्पद आहे. उपकेंद्र आडवणचे सर्व कर्मचारी, या गावातील नागरिक, सरपंच, ग्रामसेवक, सदस्य, अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर आदींचे विशेष कौतुक करते. लस अतिशय सुरक्षित आहे. लस घेणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. काननवाडी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियोजनामुळे चांगले यश मिळते आहे.
– डॉ. लता गायकवाड, गटविकास अधिकारी इगतपुरी