शिक्षण क्षेत्रातील भीष्माचार्य गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव व महासंचालक डॉ. मो. स. गोसावी सर अनंतात विलीन

इगतपुरीनामा न्यूज – शिक्षण क्षेत्रातील भीष्माचार्य गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव व महासंचालक डॉ. मो. स. गोसावी ह्यांचे ९ जुलैला वयाच्या ८८ व्या वर्षी देहावसान झाले. शिक्षण क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या अतुलनीय कार्याची दखल घेऊन त्यांना मास्टर टीचर मिलेनियम, भारतरत्न लता मंगेशकर ह्यांच्या हस्ते विद्या सरस्वती अवार्ड, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र भूषण अवार्ड , ज्ञानहीरा, राजीव गांधी फांऊडेशनचा शांतता पुरस्कार, मॅन ऑफ द इयर, नाशिक भूषण व फलटण भूषण पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. शैक्षणिक कारकीर्दीची सुरवात त्यांनी बीवायके महाविद्यालयाच्या प्राचार्य पदाची जबाबदारी घेऊन केली. पहिल्याच दिवशी कवी कुसुमाग्रजांचा ‘प्राचार्यांचे प्राचार्य व्हा’ असा आशीर्वाद त्यांना मिळाला. हे आशीर्वाद सरांनी आपल्या कार्यातून सार्थ केले. प्रभावी अध्यापनासह त्यांनी अविरत मनन, संशोधन चिंतन ह्यातून जवळपास ५० हून अधिक ग्रंथ संपदा निर्माण करून १०० हून अधिक पुस्तकांचे संपादन केले. व्यवस्थापन विषयात अमूल्य संशोधन करून पुणे विद्यापीठाची व्यवस्थापन ह्या विषयातील पदवी सर्व प्रथम प्राप्त करण्याचा बहुमान त्यांना मिळाला. वाणिज्य व व्यवस्थापन क्षेत्रातील शिक्षणासह सरांनी संस्कृत, मराठी, हिंदी व जर्मन ह्या भाषांचे ही सखोल अध्ययन केले. साहित्याचार्य, साहित्य प्राज्ञ, साहित्य विशारद ह्या पदव्या ही विशेष प्राविण्यासह प्राप्त केल्या.

सर्वात तरुण प्राचार्य व ३७ वर्षाचा सर्वाधिक कालखंड पूर्ण करणारे प्राचार्य म्हणून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील सार्थ योगदानाला ६५ वर्षे पूर्ण झाली होती. संस्थेच्या सचिव पदाची व नंतर महासंचालक पदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. यानंतर खऱ्या अर्थाने गोखले एज्युकेशन सोसायटीचा विकास व विस्तार झाला. शहरी विद्यार्थ्यां बरोबरच ग्रामीण व दुर्गम आदिवासी विद्यार्थ्यांना त्यांनी गोखले शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून शिक्षणाची कवाडे खुली केली होती. सामाजिक विकासासाठी शिक्षण हे एकमेव साधन आहे हा विश्वास ठेवून त्यांनी स्वतःला शिक्षणाच्या प्रचार – प्रसारासाठी आजीवन वाहून घेतले होते. सरांच्या प्राचार्य पदाचा प्रारंभ ज्या बीवायके महाविद्यालयातून झाला तिथे त्यांचे पार्थिव शरीर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यांच्या अंत्यदर्शनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार, कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर नेते, मंत्री ना. छगन भुजबळ, दिनकर पाटील, समीर भुजबळ, वसंत गिते, सुनील बागुल उपस्थित होते. सरांच्या अनेक प्रथितयश विद्यार्थ्यांपैकी प्रशांत खंबासवाडकर, प्रशांत अमीन तसेच नाशकातील अनेक मान्यवर, संस्थेचे देणगीदार क्षत्रिय, कपाडिया परिवाराचे सदस्यही हजर होते. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत सरांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात त्यांचे बंधू विजय गोसावी, पुत्र शैलेश, कल्पेश, कन्या प्राचार्या डॉ. दीप्ती देशपांडे, जावई प्राचार्य प्रदीप देशपांडे, दोन स्नूषा व नातवंडे असा परिवार आहे. शिक्षण क्षेत्रात स्वयं प्रकाशित, तेजस्वी ताऱ्याप्रमाणे कार्यरत राहून समाजासाठी प्रकाश वाटा तयार करणाऱ्या ह्या ज्ञान सूर्याला विनम्र अभिवादन. ( लेखन – प्रा. छाया लोखंडे – गिरी )

Similar Posts

error: Content is protected !!