
इगतपुरीनामा न्यूज, दि. ९ – इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील रोज पोहायला जाणाऱ्या १९ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. आज सकाळी ही घटना काही नागरिकांच्या निदर्शनास आली. घोटी पोलिसांना याबाबत कळवल्यानंतर त्यांनी तातडीने कार्यवाही आणि तपास सुरु केला आहे. घोटी ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली आहे. विशाल संजय गतीर वय १९ असे मयत युवकाचे नाव आहे. नेहमीप्रमाणे आज सुद्धा तो गावाजवळ असणाऱ्या नदीत पोहायला गेला होता. पोहत असतांना अचानक त्याच्या तब्येतीत बिघाड झाल्याने तो बुडाला असावा अशी चर्चा सुरु आहे. घोटी पोलिसांकडून तपास सुरु झाला असून मृत्यूचे नेमके कारण शोधले जात आहे. विशाल याचे आईवडील धार्मिक कामासाठी बाहेरगावी गेले असल्याचे समजते. ह्या घटनेमुळे मुंढेगाव येथे शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.