कांचनगावच्या माळरानावर फुलली शेकडो फळझाडे आणि फुलझाडे : आषाढीनिमित्त वृक्षलागवड आणि संवर्धन करणाऱ्या गव्हाणे कुटुंबाचे व्रत प्रेरणादायक

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. १०

इगतपुरी तालुक्यातील कांचनगाव येथील गव्हाणे परिवाराने आषाढी एकादशीच्या निमित्ताने काही वर्षांपूर्वी झाडांची लागवड आणि त्यांचे संवर्धन करण्याचे घेतलेले व्रत अखंड सुरु आहे. उजाड आणि निरूपयोगी माळरानावर लावलेल्या शेकडो उपयुक्त वृक्षांचे संगोपन गव्हाणे परिवार निष्ठेने करीत आहे. वृक्षवल्ली साक्षात परमेश्वर असून ही मौलिक संपदा पांडुरंगस्वरूप आहे असे मानणाऱ्या ह्या कुटुंबाने देवशयनी एकादशीच्या दिवशी केलेला संकल्प चांगलाच आकाराला आलेला आहे. पांडुरंग परमेश्वराच्या आशीर्वादाने कांचनगाव  येथे साडेतीन एकर माळरानावर विविध प्रकारचे फळझाडे फुलझाडे आणि अनेक जंगली झाडे आनंदाने डोलत आहेत. उर्वरित दोन गुंठ्यात फुलझाडांची बाग सुद्धा आकाराला येणार आहे. आगामी काळातही वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन करण्याचे काम सुरूच राहणार असल्याचे दीपक भाऊसाहेब गव्हाणे यांनी सांगितले. गव्हाणे परिवाराने केलेल्या कामाचे कौतुक होत आहे.

कांचनगाव येथील दीपक भाऊसाहेब गव्हाणे यांच्या कुटुंबाकडे साडेतीन एकर उघडे बोडके उजाड माळरान पणजोबा यांच्याकडून परंपरेने आलेले आहे. ह्या जमिनीत बहारदार वृक्षलागवड करण्याचा विचार आषाढी एकादशीच्या पर्वावर दीपक गव्हाणे यांच्या मनात आला. यामुळे निसर्गसंपन्नता वाढून पर्यावरण रक्षणाला हातभार लागावा, फळांचा आणि फुलांचा उपयोग लोकांच्या हृदयातल्या पांडुरंगासह सर्वांना व्हावा असा मनात आलेला विचार त्यांनी वडील भाऊसाहेब मल्हारी गव्हाणे यांना बोलून दाखवला. आई सुनीता यांनी ह्या अनोख्या उपक्रमाला पाठिंबा दिला. दिपकची सौभाग्यवती नीलम हिच्यासह भाऊ गणेश आणि त्याची पत्नी सोनाली यांनीही वृक्षलागवड आणि संगोपन करण्यासाठी झोकून देऊन काम करण्याचा शब्द दिला. आज मागे वळून पाहतांना कांचनगाव येथील उजाड माळरानावर फळझाडे आणि फुलझाडे फुलली आहेत. यामध्ये आंबे 110, जांभूळ 25, सिल्वर ओक 100, साग 20, पेरू 15, चिकू 10, फणस 15, मोहगणी 10,नारळ 30, सिताफळ 5, रामफळ 5, लक्ष्मण फळ 5, हनुमानफळ 5, लिंबू 5, कढीपत्ता 5, गवती चहा, विविध प्रकारची मसाल्याची झाडे, रेन ट्री 10, गुलमोहर 10, सुपारी 1, बेलाची झाडे 5, शेवगा 2, शिक सोने 1, अनेक प्रकारच्या केळीची झाडे अशी शेकडो झाडे आहेत. हे जतन करण्यासाठी गव्हाणे परिवारातील सर्व सदस्यांनी प्रचंड कष्ट घेतलेले आहेत. झाडांना नियमित पाणी, जनावरांपासून संरक्षण आदी कामे सर्वजण करत आहेत. आषाढी एकादशीच्या पर्वावर सुरु केलेले गव्हाणे कुटुंबाचे वृक्षवल्ली जोपासण्याचे व्रत सर्वांनी प्रेरणा घ्यावे असे मौलिक आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!