इगतपुरीनामा न्यूज, दि. ११
इगतपुरी तालुक्यातील अधरवड येथील कातकरी वस्तीत पहाटे ३ वाजेच्या सुमाराला २४ वर्षीय युवतीची अनैतिक संबधातुन हत्या केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे फिर्यादीच आरोपी निघाल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला होता. आरोपी शरद वाघ याने फिर्याद देतांना सांगितले की, माझ्या मेहुणीची जमावाकडून हत्या करण्यात आली आहे. यासह ३ कातकरी कुटुंबाची घरे जाळून टाकली, १० ते २० जणांच्या टोळक्याकडून ही घटना घडवली, पहाटेच्या वेळी ह्या टोळक्यातील १० ते २० जणांनी वस्तीत प्रवेश करुन हाणामाऱ्या सुरु केल्या. यावेळी शरद वाघ याच्यावर वार करीत असतांना न्यायडोंगरी ता. नांदगाव येथून आलेली त्यांची मेहुणी लक्ष्मीबाई पवार, वय २४ ही सोडवायला गेली. मात्र तिच्या वर्मी वार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला अशी खोटी फिर्याद घोटी पोलीसांना दिली. मात्र पोलीसांना शरद वाघ याचा संशय आल्याने त्याला पोलीसी खाक्या दाखवताच शरद वाघने खुन केल्याचा गुन्हा कबुल केला. याबाबत आरोपीच्या पत्नीने घोटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील अधरवड येथील तारीचा मोडा येथील कातकरी वस्तीत राहणारा शरद महादु वाघ याची मेव्हणी लक्ष्मीबाई बापु संजय पवार, वय २४ वर्ष, रा. बिरूळे, ता. नांदगाव, जिल्हा नाशिक यांचे अनैतिक संबध होते. लक्ष्मीबाई पवार ही शरद वाघ याला सारखा लग्नाचा तगादा लावत होती. शुक्रवारी पहाटे पुन्हा लक्ष्मीबाईने लग्नाचा तगादा लावत वाद घातला. आत्ताच लग्न कर नाही तर तुझे घर पेटवुन देईल अशी धमकी दिली. या दोघांचा वाद विकोपाला गेल्यावर लक्ष्मीबाईने शरद वाघ याचे घर पेटवुन दिले. घर पेटवल्याचा राग अनावर झाल्याने शरद वाघने घरातला कोयत्याने लक्ष्मीबाई पवारच्या गळ्यावर वार करून ठार मारले आहे. याबाबत शरद वाघची बायको सविता शरद वाघ, वय २७, रा. अधरवड हिने घोटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असुन पोलीसांनी शरद वाघ याला अटक केली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधिक्षक माधुरी कांगणे, उपविभागीय अधिकारी अर्जुन भोसले, सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर, पोलीस हवालदार शितल गायकवाड, सुहास गोसावी, संदीप मथुरे, केशव बस्ते, धनराज पारधी, शिवाजी जुदंरे आदी करीत आहे.