इगतपुरीनामा न्यूज, दि. ११
इगतपुरी तालुक्यातील अधरवड येथील कातकरी वस्तीतील पहाटे ३ वाजेच्या सुमाराला २० वर्षीय युवतीची जमावाकडून हत्या करण्यात आली आहे. यासह ३ कातकरी कुटुंबाची घरे जाळून टाकल्याची घटना घडली आहे. यामुळे इगतपुरी तालुक्यात खळबळ माजली आहे. १० ते २० जणांच्या टोळक्याकडून ही घटना घडल्याचे समजते. बारशिंगवे ता. इगतपुरी ह्या भागातील हे टोळके असून तेही आदिवासी समाजाचे आहेत. जमिनीच्या वादामधून हा प्रकार झाल्याचे प्राथमिक स्वरूपात समजले आहे. घोटी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपासकार्याला वेगाने सुरुवात करण्यात आली आहे.
स्थानिकांनी दिलेली अधिक माहिती अशी की, अधरवड येथील आदिवासी कातकरी वस्तीमध्ये शरद महादू वाघ हे आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांच्याशी बारशिंगवे येथील आदिवासी व्यक्तींशी जमिनीचा वाद आहे. याबाबत गेल्या काही दिवसांपासून ह्याबाबत वाद सुरु आहे. शुक्रवारी दुपारी या प्रकरणी बारशिंगवे भागातील ४० ते ५० जणांचे संतप्त टोळके लाठ्याकाठ्या आणि दांडके घेऊन कातकरी वस्तीत आले होते. स्थानिक पोलीस पाटील आणि रहिवाश्यांनी यावेळी मध्यस्थी करून वाद मिटवला. मात्र पहाटेच्या वेळी ह्या टोळक्यातील १० ते २० जणांनी वस्तीत प्रवेश करुन हाणामाऱ्या सुरु केल्या. यावेळी शरद वाघ यांच्यावर वार करीत असतांना न्यायडोंगरी ता. नांदगाव येथून आलेली त्यांची मेहुणी लक्ष्मी वय २० ही सोडवायला गेली. मात्र तिच्या वर्मी वार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ह्या टोळक्याने यावेळी शरद महादू वाघ, शंकर ज्ञानेश्वर वाघ, अलका संजू वाघ ह्या तीन कुटुंबाची घरे जाळून टाकली. या घटनेमुळे इगतपुरी तालुक्यात खळबळ माजली आहे. घोटी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन तपासकार्य सुरु केले आहे. दोन्ही गट आदिवासी समाजाचे असल्याचे समजते.