इगतपुरीनामा न्यूज, दि. १६
आझादी का अमृत महोत्सव उपक्रमांतंर्गत केंद्र सरकारच्या पंचायत राज विभागामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले होते. ह्या कार्यक्रमामध्ये नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात असणाऱ्या शिरसाठे ग्रामपंचायतीच्या विविध उपक्रमांचा समावेश करण्यात आला. आज दुपारी संपूर्ण देशभरात स्वच्छ असणाऱ्या शिरसाठे ग्रामपंचायतीचे प्रसारण देशवासियांना पाहायला मिळाले. ग्रामसेवक हनुमान दराडे यांनी ह्या कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करून सर्वांना विकासाची गाथा सांगितली. नवी दिल्लीत कार्यक्रम असूनही मराठी भाषेत त्यांनी संवाद साधून शिरसाठे गावातील प्रारंभापासून विकास कसा झाला याचा संपूर्ण प्रवास विशद केला. नाशिक जिल्ह्यातून फक्त शिरसाठे गावाची निवड ह्या उपक्रमात करण्यात आली होती.
नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्यासह त्यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरीच्या गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, ग्रामपंचायत विस्ताराधिकारी संजय पवार, शिरसाठेचे सरपंच गोकुळ सदगीर, ग्रामसेवक हनुमान दराडे यांनी ह्या कार्यक्रमात सहभाग घेतला. मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी शिरसाठे ग्रामस्थ, पदाधिकारी यांचे विशेष कौतुक करून आगामी काळात अधिकाधिक विकास साधण्यासाठी शुभेच्छा दिल्या. ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनीही शिरसाठे गावाचे कौतुक करून यशोगाथेचा अनेक गावांना लाभ होणार असल्याचे सांगितले.